नारायण राणेंचा घटस्थापनेला 'घटस्फोट', काँग्रेसच्या आमदारकीसह सदस्यत्वाचाही दिला राजीनामा, दस-यापूर्वी पुढील भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 09:21 PM2017-09-21T21:21:12+5:302017-09-21T21:24:49+5:30

गेली बारा वर्षे काँग्रेसने माझा उपयोग करून घेतला. मात्र, शिवसेना सोडल्यानंतर मला पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदाचे दिलेले आश्वासन सत्ता असताना ९ वर्षात पाळले गेले नाही. मला चारवेळा मुखख्यमंत्री पदाची हुलकावणी मात्र, देण्यात आली.

Narayan Rane's resignation, 'divorce', resigns with Congress MLAs, resigns ten | नारायण राणेंचा घटस्थापनेला 'घटस्फोट', काँग्रेसच्या आमदारकीसह सदस्यत्वाचाही दिला राजीनामा, दस-यापूर्वी पुढील भूमिका

नारायण राणेंचा घटस्थापनेला 'घटस्फोट', काँग्रेसच्या आमदारकीसह सदस्यत्वाचाही दिला राजीनामा, दस-यापूर्वी पुढील भूमिका

Next
ठळक मुद्देगटनेतेपदासाठीही डावललेशिवसेनेचे २७ आमदार राजीनाम्याच्या तयारीतसोनिया गांधींचे  मानले आभार

- सुधीर राणे/रजनीकांत कदम। 

ओसरगाव (कणकवली), दि. 21 - गेली बारा वर्षे काँग्रेसने माझा उपयोग करून घेतला. मात्र, शिवसेना सोडल्यानंतर मला पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्रीपदाचे दिलेले आश्वासन सत्ता असताना ९ वर्षात पाळले गेले नाही. मला चारवेळा मुखख्यमंत्री पदाची हुलकावणी मात्र, देण्यात आली.  त्यामुळे गुरूवारी (२१ रोजी) दुपारी अडीच वाजता आपण काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविला आहे. तर विधान परिषदेतील आमदारकीचा राजीनामाही तत्पूर्वीच २ वाजून २५ मिनीटांनी सभापतींना दिला असून आता मी काँग्रेसमुक्त झालो आहे. यापुढे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून दस-यापूर्वी माझी पुढील दिशा जाहीर करेन. येत्या काळात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राज्यातून रिकामे करणार असा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ओसरगाव (ता. कणकवली) येथे  बोलताना व्यक्त केला. 
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेला आपली भविष्यातील वाटचाल स्पष्ट करणार असे नारायण राणे यांनी सोमवारी कुडाळ येथील काँग्रैसच्या मेळाव्या दरम्यान सांगितले होते. त्यामुळे गुरूवारी राणे काय घोषणा करणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आगामी काळात महाराष्ट्रात जोरदार धक्का देण्याचे जाहीर केले आहे. गुरूवारी सोलापूर, सातारा, कोल्हापूर येथून राणे यांचे काही समर्थक पदाधिकारी सिंधुदुर्गात दाखल झाले होते. यावेळी सोलापूरमधील  २५ नगरसेवक आपल्या पाठिशी असल्याचा दावा राणे यांनी केला. तसेच सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुखही आपल्याबरोबरच असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. 
यावेळी माजी खासदार नीलेश राणे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अशोक सावंत, विकास कुडाळकर, रणजीत देसाई, संदेश सावंत, प्रणिता पाताडे, अंकुश जाधव, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संजू परब, संदीप कुडतरकर, सोलापूरचे माजी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राजीनामे दिलेले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले,  २00५ मध्ये शिवसेना सोडल्यानंतर सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी आपली त्यांच्याशी भेट घडविली. या भेटीत आपल्याला मुख्यमंत्री पदाचे आश्वासन देण्यात आले होते. एकावेळी तर राज्यातील ४८ आमदारांनी मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला असतानाही आपल्याला डावलण्यात आले. तर त्यावेळी अशोक चव्हाण यांना ३२ आणि विखे पाटील यांना ४ मते पडलेली असतानाही अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री करण्यात आले. ते आदर्शमध्ये घरी बसले. पुढील वेळी मुख्यमंत्री झालेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याला उद्योगमंत्री पद देऊन पहिला उद्योग केला. मात्र, त्यांनी केलेल्या उद्योगानंतर पुढे राज्यात काँग्रेसची सत्ताच आली नाही. 

गटनेतेपदासाठीही डावलले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर राणे यांनी चौफेर टीका केली. अशोक चव्हाण यांनी आपल्याला कशाप्रकारे प्रत्येकवेळी डावलले याचा घटनाक्रमच सादर केला. राणे म्हणाले,  मी पदांच्या मागे जात नाही, पदं माझ्या मागे येतात त्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्याला विधानपरिषदेसाठी आमदारकी मिळतानाही अशोक चव्हाण यांनी विरोध केला होता. मात्र, राहुल गांधी  यांनी आपल्याला विधानपरिषदेत आमदार केले. विधानपरिषदेत काँग्रेसमध्ये मी ज्येष्ठ असूनही गटनेतेपदी निवड झाली नाही. तर शरद रणपिसे यांना गटनेतेपद देण्यात आले. राणेंना प्रत्येकवेळी अडचण निर्माण करण्याचेच काम अशोक चव्हाण यांनी केले. 

‘आदर्श’मधून वाचण्यासाठी पद
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी काही केले नाही. काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष होण्याची त्यांची पात्रताही नाही.  नांदेडचे खासदार राजीव सातव यांचाही चव्हाणांच्या अध्यक्षपदाला विरोध आहे. केवळ ‘आदर्श’मधून वाचण्यासाठी त्यांनी पद घेतले आहे. माझ्यासह माजी खासदार नीलेश आणि सिंधुदुर्गमधील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडले आहे. अशोक चव्हाण यांचा एकमेव विश्वासू विकास सावंत आता शिल्लक आहे. जिल्हा बँकेचा सावंत हा थकबाकीदार असून जो माणूस स्वत:चे कुटुंब सांभाळू शकत नाही त्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद देऊन अशोक चव्हाण यांनी पक्षनिष्ठा सिद्ध केली आहे.

सर्व कार्यकारिणी राजीनामा देण्याची ऐतिहासिक घटना
काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक ओसरगाव येथील महिला भवन येथे गुरूवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे नारायण राणे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच माजी खासदार नीलेश राणे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यासंबंधीचा ठराव या बैठकीत घेण्यात आला. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मधुसूदन बांदिवडेकर यांनी हा ठराव मांडला. त्याला उपाध्यक्ष नासीर काझी यांनी अनुमोदन दिले. काँग्रेसच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्व कार्यकारिणी एकाचवेळी राजीनामा देण्याची ही पहिलीच  ऐतिहासिक घटना आहे असे राणे यांनी यावेळी सांगितले. 

दस-यापूर्वी पुढील निर्णय
मी उद्यापासून महाराष्ट्राच्या विविध भागात दौरा करणार आहे. त्याची सुरूवात नागपूरपासून करणार असून त्यानंतर औरंगाबाद, नांदेड, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागात जाऊन लोकांना भेटणार आहे. लोकांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या सूचनाही ऐकून घेणार आहे. त्यानुसार दिशा ठरवून दसºयापूर्वी पुढील निर्णय जाहीर करणार आहे. यानंतर मात्र कोकणी आणि महाराष्ट्रातील जनतेचे भले होण्यासाठीची भूमिका घेऊ, असेही ते म्हणाले. 

शिवसेनेच्या चक्रव्युहातून २००५ मध्येच निसटलो
गेले दोन दिवस प्रसार माध्यमातून नारायण राणेंचा अभिमन्यू होतोय अशी चर्चा केली जात आहे. याबाबत बोलताना राणे म्हणाले, माझा अभिमन्यू करण्याची ताकद कोणामध्ये नाही. मी शिवसेनेच्या चक्रव्युहातून २००५ सालीच बाहेर पडलो. चक्रव्युह भेदण्याची कला मला अवगत आहे. काँग्रेसमध्ये मी जर अभिमन्यू असेन तर दुर्योधन कोण? अशोक चव्हाण की मोहन प्रकाश हे तुम्हीच ठरवा असेही ते म्हणाले. 

शिवसेनेचे २७ आमदार राजीनाम्याच्या तयारीत
उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, माझी शिवसेनेतील राजकीय कारकीर्द अतिशय चांगली होती. पण उद्धवना ते पहावले नाही. सध्या त्यांना नाकच राहिलेले नाही. तते सरकारमधून बाहेर पडू शकत नाहीत. तसे झाल्यास शिवसेनेचे २७ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी ‘रडा-रडी’ चे राजकारण आपण सर्वांनी पाहिले आहे. असेही राणे म्हणाले. 

काँग्रेसचे दुकान बंद पडायला आले
आगामी काळात काँग्रेसमुक्त हा आपला अजेंडा रहाणार आहे का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणे म्हणाले, अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा राज्यातील अस्त जवळ आला आहे. लवकरच काँग्रेसचे दुकान बंद होईल. याला काँग्रेसमुक्त म्हणता येणार नाही.  कारण विकास सावंत सारखे निरूपयोगी लोकं काँग्रेसमध्येच राहतील. 

सोनिया गांधींचे  मानले आभार
आपण आज काँग्रेसचा राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविला. त्यावेळी त्यांचे आभारही मानले आहेत. आजच्या घडीला मी कोणावरही टीका करणार नाही. गेल्या  बारा वर्षांत मी काँग्रेसमध्ये प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न केला.  मात्र, काही कटकारस्थानी लोकांनी माझा वापर करून घेत पद देण्याच्यावेळी डावलले. 

भाजप, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांबाबतच्या प्रश्नांवर मौन
काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर आता मी मुक्त झालो आहे असे राणे यांनी सांगताच पत्रकारांनी भाजप  पक्षाबाबत, पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत, राज्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांबाबत, मराठा आरक्षणाविषयी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत अशा अनेक प्रश्नांतून राणे यांना बोलते केले. मात्र, अगदी अभ्यासू असल्याप्रमाणे या सर्व प्रश्नांवर त्यांनी थेट बोलणे टाळून दसºयापर्यंत तुम्ही प्रतिक्षा करा, मी माझा निर्णय स्वत: जाहीर  करीन असे सांगत न बोलणेच पसंद केले. 

मराठा आरक्षण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. असे एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान, राणे यांनी ठणकावून सांगितले. गेल्या काही दिवसात आपल्याला सुशिलकुमार शिंदे यांच्यासह काही नेत्यांचे फोन आले. त्यांनी तुमच्याशी बोलायचे आहे, असे सांगितले. मात्र, पक्ष सोडू नका असे कोणीही सांगितलेले नाही.

सुप्रिया सुळे, राज ठाकरेंना टोला
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बुधवारी नारायण राणे यांच्या पक्षबदलण्याबाबत प्रसार माध्यमांकडे टीका केली होती. त्याचा समाचार राणे यांनी यावेळी घेतला. ते म्हणाले, असे असेल तर मग शरद पवारांना काय म्हणायचे ? तर राज ठाकरे आजच मुंबईत फेसबुक पेजच्या अनावरणप्रसंगी राणेंचा फुटबॉल झाला असल्याची नाव न घेता टीका केली होती. त्यावर राणे म्हणाले. ज्यांचा फुटबॉल निकामी झाला आहे. त्यांच्याबद्धल काय बोलू. माझ्या घरात दोन आमदार आहेत. तर त्यांच्या पक्षाचा पूर्ण राज्यात एकच आमदार आहे.

Web Title: Narayan Rane's resignation, 'divorce', resigns with Congress MLAs, resigns ten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.