कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून होणार आहेत. या स्पर्धा येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहेत. २४, २५ व २६ डिसेंबर रोजी शालेय व खुल्या गटातील स्पर्धा होतील, अशी माहिती वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष वामन पंडित आणि कार्यवाह प्रसाद कोरगावकर यांनी येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ही एकांकिका स्पर्धा सलग २५ वर्षे सुरू आहे. २६ डिसेंबर रोजी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. ४० वर्षांच्या वाटचालीत ज्या संस्थांनी आपले योगदान दिले त्या संस्थांचा सन्मान २६ डिसेंबर रोजी केला जाणार आहे. एकांकिका स्पर्धा चळवळीतील महत्त्वाच्या रंगकर्मींना आमंत्रित करून एकांकिका चळवळीच्या भवितव्याबाबत २७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता परिसंवाद होणार आहे. विजेत्याला रोख ५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे.
नाथ पै एकांकिका स्पर्धेच्या गेल्या ४० वर्षांतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि आज जे जिल्ह्यात वास्तव्यास आहेत त्या सर्वांचे स्नेहसंमेलन होणार आहे.
एकांकिका लेखक डॉ. चंद्रशेखर फणसळकर यांच्या एकांकिकांचा महोत्सव हा कार्यक्रम २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी डॉ. फणसळकरांची मुलाखत व पुस्तक प्रकाशन होणार आहे. संस्थेने आजवर ६ लेखकांच्या एकांकिकांचे महोत्सव आयोजित केले आहेत. रात्री ८ वाजता एकांकिका महोत्सव होणार आहे.
सुमारे ६० हजारांची रोख बक्षिसे विजेत्यांना देण्यात येणार आहेत. स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रही विजेत्यांना देण्यात येईल, अशी माहिती वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आली आहे.