मालवण : पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०१९-२० साठी तालुक्यातील मालोंड ग्रामपंचायतीला राष्ट्रीय स्तरावरील मानांकन मिळाले आहे. या ग्रामपंचायतीने ऑनलाइन नामांकन भरत १०० गुणांच्या परीक्षेत ९७ गुण मिळवित जिल्ह्यात अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.या पार्श्वभूमीवर सोमवारी सांगलीच्या समितीकडून तपासणी केली जात आहे. तालुक्यातील गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायतीला चाइल्ड फ्रेंडली ग्रामपंचायत म्हणून तर बुधवळे-कुडोपी ग्रामपंचायतीला आमचा गाव, आमचा विकासअंतर्गत मानांकन मिळाले आहे. या ग्रामपंचायतीची तपासणीही नजीकच्या काळात होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी दिली.पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्कारासाठी तालुक्यातील मालोंड ग्रामपंचायतीने ऑनलाइन नामांकन भरले होते.यात ग्रामपंचायतीला १०० पैकी ९७ गुण मिळाले, तसेच ई-गव्हर्नर्स थीममध्येही ग्रामपंचायतीला यश मिळाले आहे. मालोंड ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशाली घाडीगावकर, उपसरपंच अर्जुन परब, ग्रामसेवक भगवान जाधव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावात विविध उपक्रम, कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविले. त्यांना गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी प्रभाकर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय स्तरावरील मानांकन मिळाल्याबद्दल सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, सर्व पंचायत समिती सदस्यांनी अभिनंदन केले आहे. पंडित दीनदयाळ पंचायत सशक्तीकरण पुरस्काराचे वितरण २४ एप्रिल रोजी पंचायतराज दिनाच्या दिवशी केले जाते. या पुरस्कारासाठी ८ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. मानांकनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सांगली जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, सहायक गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांच्या समितीकडून तपासणी करण्यात येत आहे.