लोकमत न्यूज नेटवर्ककुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना मिळणाऱ्या खंडित सेवेबाबत गुरुवारी राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने अधीक्षक अभियंता यांच्या केबिनबाहेर दोन तास ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. वीज ग्राहकांना भोंगळ सेवा दिली जात असल्याने राष्ट्रवादीकडून वीज वितरण कंपनीला निर्लज्ज रत्न पुरस्कार देऊन पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आठ दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना चांगली सेवा दिली जात नसल्याबरोबरच वाढीव बिले तसेच अन्य तक्रारी यांच्याकडे लक्ष वेधले होते. परंतु त्याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप करीत गुरुवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद रेगे यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयावर धडक दिली. मात्र ते अधिकारी उपस्थित नसल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केबिनबाहेरच ठिय्या ठोकला. त्यानंतर अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील आले. त्यांनी पदाधिकाऱ्यांना केबिनमध्ये चर्चेसाठी बसण्यास सांगितले. मात्र पदाधिकाऱ्यांनी ती मागणी अमान्य करीत ठिय्या करत त्याच ठिकाणी चर्चा करण्यास सांगितले. आठ दिवसात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीच कार्यवाही केली नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने वीज वितरण कंपनीला निर्लज्ज रत्न पुरस्कार देण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. मात्र अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. यावेळी अमित सामंत, भास्कर परब, बाळ कनयाळकर, आत्माराम ओटवणेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीने दिला ‘निर्लज्ज रत्न’ पुरस्कार
By admin | Published: June 30, 2017 1:03 AM