युवा पिढीला निसर्गाकडे वळविण्याची गरज : रामेश्वर सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:47 PM2020-12-02T17:47:49+5:302020-12-02T17:49:18+5:30
forest, sindhudurgnews सोशल मीडिया, सवंग करमणूक यांच्या आहारी गेलेल्या, काहीशा दिशाहीन झालेल्या युवा पिढीला खऱ्याखुऱ्या आनंदी, निरोगी जीवनाचे दर्शन घडवायचे असेल तर त्यांना पुन्हा निसर्गाकडे वळविले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गिर्यारोहक आणि सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष रामेश्वर सावंत यांनी भैरवगड (ता. कणकवली) येथे केले.
सिंधुदुर्गनगरी : सोशल मीडिया, सवंग करमणूक यांच्या आहारी गेलेल्या, काहीशा दिशाहीन झालेल्या युवा पिढीला खऱ्याखुऱ्या आनंदी, निरोगी जीवनाचे दर्शन घडवायचे असेल तर त्यांना पुन्हा निसर्गाकडे वळविले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गिर्यारोहक आणि सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष रामेश्वर सावंत यांनी भैरवगड (ता. कणकवली) येथे केले.
सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबने भैरवगड या वनदुर्गावर दोन दिवसांची दुर्गभ्रमण मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेत ३२ दुर्गप्रेमी सहभागी झाले होते. यात ज्येष्ठ गिर्यारोहक निनाद खोत, ह्यघुंगुरकाठी-सिंधुदुर्गह्ण संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत, कवयित्री डॉ. सई लळीत, पर्यावरण तज्ज्ञ श्रीधर पेडणेकर, उभयचर प्राणी तज्ज्ञ गुरु कदम, अक्षय दळवी, पक्षी तज्ज्ञ प्रवीण सावंत, प्रथमेश माळकर, मोहीम नेता प्रतीक गुरव, हेमंत परब, चित्रकार अक्षय मेस्त्री आणि अन्य दुर्गप्रेमी सहभागी होते. यात दहा महिलांचा समावेश होता.
या मोहिमेच्या समारोपप्रसंगी भैरवगडावरील भैरव मंदिराच्या प्रांगणात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी सतीश लळीत यांनी मोहिमेच्या यशस्वी आयोजनाबद्दल रामेश्वर सावंत यांचा शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. या मोहिमेचे सर्व व्यवस्थापन कौशल्याने सांभाळणारे युवक प्रतीक गुरव व हेमंत परब यांचा सत्कार सावंत यांनी केला.
सावंत पुढे म्हणाले, आजकालचे जीवन अतिशय धावपळीचे झाले आहे. तेवढेच ते कृत्रिम झाले आहे. माणूस निसर्गापासून दूर जात आहे. पर्यावरणाची आणि निसर्गाची हानी होत आहे. युवकांमध्ये निसर्ग, पर्यावरण, साहसी खेळ यांची आवड निर्माण करण्यासाठी सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबने ही दुर्गमोहीम आयोजित केली होती.
यावेळी सतीश लळीत म्हणाले, कोरोनाच्या साथीमुळे व सततच्या टाळेबंदीमुळे कोंडलेपणा आला होता. आता प्रशासनाने नियम पाळून भ्रमंतीला परवानगी दिली आहे. या दुर्गभ्रमण मोहिमेमुळे सर्वच सहभागींना निसर्गाच्या अगदी जवळ जाण्याची संधी मिळाली आहे, असेही ते म्हणाले.
ऐतिहासिक घटनांची केली उजळणी
भ्रमंतीच्या पहिल्या दिवशी गडावरील नागणीचे पाणी या ठिकाणी ट्रेक व पक्षीनिरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेथे प्रवीण सावंत यांनी सह्याद्रीमधील जैवविविधतेची माहिती दिली. रात्री शेकोटीच्या कार्यक्रमात देशभक्तीपर गाणी, कविता, ऐतिहासिक घटनांची उजळणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी गडावर स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. लवकरच पुढील मोहीम जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.