सावंतवाडी : काँग्रेस संपली नव्हती, तर काँग्रेसला थोडे वाईट दिवस आले होते. त्यामुळे कोणी कितीही म्हटले तरी काँग्रेस पक्ष संपणार नाही. आता पक्ष पुन्हा उभारी घेईल. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस बळकट करण्याचे नवे आव्हान माझ्यासमोर आहे आणि ते मी नक्कीच पेलेन, असा विश्वास नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी व्यक्त केला. रविवारी येथील आदिनारायण मंगल कार्यालयात गावडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गावडे यांनी काँग्रेसच्या आगामी रणनितीबाबत माहिती दिली.
यावेळी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, माजी आमदार सुभाष चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, जिल्हा प्रवक्ते अॅड. दिलीप नार्वेकर, वेंगुर्ला उपसभापती सिद्धेश परब, इर्शाद शेख, राजू मसुरकर, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, पी. एफ. डान्टस, काँग्रेस नेते दादा परब जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर, नागेश मोर्ये, तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, शहरअध्यक्ष काशीनाथ दुभाषी, कुडाळ तालुकाध्यक्ष आबा मुंज, कौस्तुभ गावडे, विभावरी सुकी, अमिंदी मेस्त्री, राघवेंद्र नार्वेकर, अरुण भिसे आदी उपस्थित होते.
गावडे पुढे म्हणाले, मला नेहमी आव्हाने पेलायला आवडतात. त्यामुळे आता सहा महिन्यांत जिल्ह्यातील सर्व निवडणुकांचे निकाल बदलण्याचे आव्हान माझ्यासमोर आहे आणि मी ते स्वीकाले आहे. ते पुढे म्हणाले, भाजप सरकारने याठिकाणी युवकांना नोक-या देण्याची फक्त आश्वासने दिली. मात्र, ती पूर्ण केली नाहीत.
माझ्या नसानसात काँग्रेस भिनली आहे : विकास सावंतमाजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आपला मौनाला वाट करून देत यावेळी अनेकांना खडे बोल सुनावले. मी पक्षाच्या पडत्या काळात काँग्रेस सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सोशल मीडियावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका माझ्यावर करण्यात आली.माझ्या नसानसात काँग्रेस भिनलेली आहे. त्यामुळे काँग्रेसविरोधात जाऊन मी कधीही काम केले नाही.
सावंतवाडी येथे झालेल्या काँग्रेस बैठकीत नूतन जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांचा सत्कार प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, सुभाष चव्हाण, राजू मसुरकर, विकास सावंत, दिलीप नार्वेकर यांच्या उपस्थितीत झाला.