नव्या महामार्गालगत वृक्ष लागवड हवीच
By admin | Published: May 18, 2015 10:31 PM2015-05-18T22:31:34+5:302015-05-19T00:30:18+5:30
पक्षी मित्र संमेलन : चौपदरीकरणात तोडल्या जाणाऱ्या वृक्षांसाठी दबाव गट तयार
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. या दरम्यान काही झाडेही तोडली जाण्याची शक्यता आहे. यासाठी शासन पातळीवर नवीन वृक्षलागवड करणे गरजेचे असल्याचा सूर चिपळूण येथे झालेल्या ४ थ्या कोकण पक्षी मित्र संमेलनात खुल्या चर्चेतून पुढे आला आहे.शहरातील माधव सभागृहात सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेतर्फे कोकण पक्षी मित्र संमेलन घेण्यात आले. यावेळी पक्षी संवर्धनासाठी विविध उपाय योजना कशा पद्धतीने राबविल्या जाव्यात यावर चर्चा झाली. सध्या होणाऱ्या जंगलतोडीमुळे पक्षांची संख्या घटत आहे. निसर्ग संवर्धनाच्या कार्यात सर्वांचे सहकार्य अपेक्षीत असून हे काम पुढे नेटाने करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या संमेलनात खुल्या चर्चेत पक्षी निरीक्षण व निसर्ग संवर्धन याबाबत चर्चा झाली. मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने वृक्ष तोड होण्याची शक्यता आहे. यासाठी आतापासून आवश्यक तेथे वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. यासाठी शासन स्तरावर योग्य पर्याय राबविणे तितकेच महत्वाचे असून यासाठी सह्यांची मोहीम राबविण्याबाबत चर्चा झाली.महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी सांगितले की, शासन स्तरावर वनविभाग, निसर्गप्रेमी संघटना, निसर्ग संवर्धनाचे काम आपापल्या पद्धतीने करीत असतात. त्यांनी परस्पर संपर्क वाढवून हे काम पुढे नेले तर ते जास्त प्रभावी होईल. गिधाडांच्या घरट्यासाठी दत्तक योजना राबविणे, महामार्गाचे चौपदरीकरण होताना तोडण्यात येणाऱ्या झाडांबाबत दबाव गट स्थापन करुन कमीत कमी वृक्षतोड व्हावी आदी ठराव करण्यात आले. (वार्ताहर)
चौथ्या कोकण पक्षी मित्र संमेलनात खुल्या चर्चेतील सूर
गिधाडांच्या घरट्यांसाठी दत्तक योजना राबविण्याचा मानस
कोकण परिसरातील पक्षी वेबसाईट तयार करणार
पक्षांचा शास्त्रीय अभ्यास यासाठी ३० रोजी बैठक
महामार्गाच्या कामात तोडण्यात येणाऱ्या झाडांबाबत अभास गट