सिंधुदुर्गनगरी : पश्चिम महाराष्ट्र भागाचे निकष कोकण प्रांतात लावून येथील दुग्धविकास होणार नाही. येथील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. कोकणासाठी स्वतंत्र निकष झाले पाहिजेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी ४० आमदार भांडत असतील पण कोकणासाठी मी एकटा पुरेसा आहे. मात्र, यासाठी तुमची ताकद महत्त्वाची आहे. तुम्ही संघटित रहा. तुम्हांला कृतीतून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मी देतो, असे प्रतिपादन दूध उत्पादक मोर्चाला संबोधित करताना आमदार नीतेश राणे यांनी केले.दूध उत्पादकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर आल्यानंतर नीतेश राणे यांचे भाषण झाले. यावेळी आमदार राणे म्हणाले, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी गावोगावी जात दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये याविषयी जनजागृती केली. त्यामुळे एवढा मोठा प्रतिसाद लाभला. तुम्ही संघटित झालात.
आपण शांततेच्या मार्गाने आज आंदोलन केले. हेच आंदोलन महाराष्ट्राच्या अन्य भागात हिंसक बनले आहे. त्यामुळे शासनाने आम्हांला तिसरा डोळा उघडायला लावू नये, असा इशाराही त्यांनी दिला.