कणकवली : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर हे जादूटोणा करतात. त्यांच्याकडून बंगाली जादुचे प्रयोग केले जातात असा आरोप त्यांचेच सहकारी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सहकारी सुर्यकांत दळवी यांनीही तसाच आरोप मंत्री कदमांवर केलेला आहे.
हे दोन्ही आरोप करणाऱ्या व्यक्ती दोन्ही मंत्र्यांच्या जवळच्या आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले हे आरोप नसून सत्यच आहे . असे म्हणावे लागेल. असे सांगतानाच शिवसेनेच्या नेत्यांबाबत जनतेने विश्वास ठेवावा का? लोकशाही प्रक्रियेतून हे नेते चालतात का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले. कणकवली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, दीपक केसरकरांबाबत आम्ही अनेक गोष्टी ऐकून होतो. परंतु , बबन साळगावकर हे केसरकरांच्या गाडीतून फिरणारे एक प्रमुख व्यक्ती आहेत. तसेच बबन साळगावकर यांच्याकडे एक डायरी देखील आहे. त्या डायरीत अनेक उल्लेख असल्याचे ते सांगतात.जर बंगाली जादुचे प्रयोग करुन दीपक केसरकर आणि रामदास कदम निवडणुका जिंकत असतील तर ही बाब लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे जनतेने तरी लोकशाहीवर विश्वास ठेवावा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खऱ्या अर्थाने या आरोपांमुळे केसरकर यांच्या बौद्धीक विचारांचे हे अपयशच असल्याचे स्पष्ट होत आहे. अशी टीका राणे यांनी केली .