वेगुर्ला : भूमिपुत्र संघाच्या आक्रमक पवित्र्यामुळे शासनाच्या अधिकाऱ्यांनी शिरोडा-वेळागर येथील सर्व्हे नंबर २९ पासून सुरू होणाऱ्या जमीन मोजणी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर जमीन मोजणीसाठी आलेले अधिकारी भूमिपुत्रांच्या रौद्ररूपामुळे जमीन मोजणी न करताच माघारी फिरले. परिणामी शासनाने ताज ग्रुपसाठी दडपशाहीने हाती घेतलेला जमीन मोजणी कार्यक्रम सपशेल फसला. दरम्यान, जोपर्यंत संबंधित अधिकारी येऊन आमच्याशी आमच्या समस्यांबाबत चर्चा करून तोडगा काढत नाहीत तोपर्यंत मोजणीला आमचे सहकार्य राहणार नाही ही भूमिका संघाने कायम ठेवली आहे.भूमी अभिलेख विभागाने येथील शेतकऱ्यांना मोजणीच्या नोटीसा २ मार्चला दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान भूमी अभिलेखचे अधिकारी जमीन मोजणीसाठी येणार असल्याने शिरोडा वेळागर भूमिपुत्र संघाच्यावतीने अध्यक्ष भाई रेडकर यांच्यासह खजिनदार जगन्नाथ डोंगरे, सचिव आरोसकर तसेच राजू आंदुर्लेकर, गुरु रेडकर, नाना कांबळी, राजश्री आंदुर्लेकर, शारदा आरोसकर, कमलाकर कांबळी, विजय पडवळ, विष्णू खोत, दीपक पडवळ, मिलिंद रेडकर यांच्यासह अन्य भूमिपुत्र महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळकरिता दीपक भूपल यांच्या नावे जमीन मोजणी बाबत नोटीस काढून त्याच्या प्रती या सर्व्हेमधील शेतकऱ्यांना पाठविल्या आहेत. मात्र, भूमिपुत्रांचे रौद्र रूप पाहून शासनाचे अधिकारी येथे फिरकलेच नाही.केवळ वेंगुर्ला येथील भूमी अभिलेख विभागाचे गौतम कदम हे जमीन मोजणी साठी आले होते.
त्यांच्यासमोर भूमिपुत्रांनी संताप व्यक्त केल्याने त्यांनी पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी जमीन मोजणीच्या वेळी दाखल झाले नाहीत तसेच स्थानिक भूमिपुत्रांचा ही मोजणीला विरोध असल्याने आपण मोजणी न करता माघारी फिरत आहोत असे पंच यादीत नमूद केले. या पंच यादीवर संघाचे अध्यक्ष भाई रेडकर, माजी आमदार शंकर कांबळी, जगन्नाथ डोंगरे, दीपक पडवळ, कर्मचारी निवृत्ती परब यांच्या सह्या आहेत.
दरम्यान, जोपर्यंत आमच्या पश्नांबाबत शासनाचे अधिकारी बसून चर्चा करीत नाहीत तोपर्यंत आमचा सगळ्याच कामाला असहकार राहील असे भूमिपुत्र संघाने जाहीर केले आहे.