बांदा : दोडामार्ग तालुक्यातील पडवे-माजगाव येथील लक्ष्मण भागू शिंदे (६५) यांचे माकडतापाने गोवा-बांबोळी रुग्णालयात निधन झाल्याने दशक्रोशीत खळबळ उडाली आहे. माकडतापाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.
शिंदे यांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेने सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आढावा बैठक झाली. आरोग्य कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात एकूण ८ रुग्ण माकडतापग्रस्त असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यातील डेगवे येथील रुग्णावर गोवा-बांबोळी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती देखील गंभीर असून गेले एक महिना उपचार सुरू आहेत.माकडतापाने शिंदे यांचा बळी गेल्याने गावात ऐन काजू हंगामाच्या तोंडावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पडवे, माजगाव, असनिये, डेगवे येथील रुग्ण तळकट प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचार घेत आहेत. त्यातील ३ रुग्ण माकडताप पॉझिटीव्ह आहेत.माकडतापाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सभापती सावी लोके यांनी तातडीची आढावा बैठक बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतली. जिल्ह्यात रक्त तपासणी प्रयोगशाळा नसल्याने रक्ताचे अहवाल मिळण्यात बराच विलंब होतो. त्यामुळे संशयित रुग्णावर योग्य उपचार होण्यास विलंब होत असल्याची कैफियत बांदा सरपंच अक्रम खान यांनी मांडली.केएफडी प्रयोगशाळा बांधकाम करण्याची कार्यवाही तातडीने करण्याची मागणी अक्रम खान यांनी केली. सभापती सावी लोके यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. त्यामुळे त्याचा अहवाल येण्यास विलंब होत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी विलंब होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यासाठी बांदा किंवा दोडामार्ग येथे प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. शिंदे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, तीन मुली असा परिवार आहे.