वृद्ध कलाकारांना मानधन; १०८ प्रस्तावांना मंजुरी
By admin | Published: March 29, 2016 10:21 PM2016-03-29T22:21:45+5:302016-03-29T23:58:42+5:30
महाराष्ट्रातील वृध्द कलाकार व साहित्यिकांना मानधन योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र कलाकार व साहित्यिक निवड समितीची बैठक प्रकाश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत घेण्यात आली
रत्नागिरी : समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषदमार्फत राबवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यवर वृध्द कलाकार व वृध्द साहित्यिकांना मानधन या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र १०८ प्रस्तावांना निवड समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरीमार्फत राबविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यवर वृध्द कलाकार व वृध्द साहित्यिकांना मानधन या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र वृध्द कलाकार व साहित्यिक निवड समितीची बैठक प्रकाश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात नुकतीच घेण्यात आली. बैठकीला सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, आनंद पुसावळे, तहसीलदार हेमंत साळवी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुनील सैद तसेच समिती सदस्य प्रकाश वसंत काणे, अनिल दांडेकर, शरद चव्हाण, अरविंंद जाधव, डॉ. दिलीप पाखरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.बैठकीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समितीमार्फत प्राप्त झालेल्या एकूण १२१ कलाकारांच्या प्रस्तावांमधून १०८ परिपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यात मंडणगड २३, दापोली १४, खेड २१, चिपळूण १०, गुहागर १६, संगमेश्वर २, रत्नागिरी ४, लांजा १४, राजापूर ४ याप्रमाणे प्रस्तावांचा समावेश आहे. १०८ कलाकारांचे हे अर्ज समितीच्या शिफारसीसह पुढील मंजुरीकरिता संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)