कुडाळ : अच्छे दिन फक्त भाजपाचे आले असून जनतेचे मात्र या भूलथापा मारणा-या भाजपा सरकारमुळे बुरे दिन आले असल्याचा आरोप भाजपावर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी कुडाळ येथे करीत नोटाबंदीच्या विरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढून काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी भाजप सरकार विरोधात काँग्रेसच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी निर्णय जाहीर केला होता. या नोटाबंदीच्या निर्णयाला आता एक वर्ष पूर्ण झाले असून, या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या वतीने कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कुडाळ पोस्ट कार्यालय या नोटाबंदी विरोधात निषेध मोर्चा काढला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत, जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, आबा मुंज, नीता राणे, चंद्रशेखर जोशी, विजय प्रभू, आय. वाय. शेख, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, बाळा गावडे, प्रेमानंद देसाई, लक्ष्मण पोकळे, दादा परब, बाळा धाऊसकर, नंदू गावकर, इर्शाद शेख, चित्रा कनयाळकर, सदासेन सावंत, राजू मसूरकर, जगन्नाथ डोंगरे, गुरूनाथ मुंज, मेघनाद धुरी, दिलीप कावले, जेम्स फर्नांडिस, उत्तम चव्हाण, मयुरे आरोलकर, बापू बागवे, बच्चू नाईक, विजयमाला सावंत, मेधा सावंत, माया चिटणीस, वृषाली राऊळ, विभावरी सुकी यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरूवात झालेली रॅली गांधी चौक, जिजामाता चौक, कुडाळ पोस्ट कार्यालय ते पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अशी काढण्यात आली.यावेळी काँग्रेसकडून नोटाबंदीचा निषेध करत सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. रॅलीनंतर काँग्रेसच्या वतीने डॉ. आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास सावंत म्हणाले, आर.एस.एस. सारख्या संघटना भाजप पक्षाच्या ब्रेन आहेत. निवडणूक काळात विकासाच्या पोकळ वल्गना करणा-यांनी देशासाठी काय योगदान दिले, असा सवाल उपस्थित केला. सरकारने राबविलेल्या नोटाबंदीसारख्या चुकीच्या निर्णयांमुळे भाबड्या जनतेचा नाहक बळी जात आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागल्याचे सावंत म्हणाले.या अगोदर फसव्या घोषणा करून जनतेला फसविल्यानंतर गुजरातच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवनवीन घोषणा देण्याचे काम पंतप्रधान करीत आहेत. या घोषणांना जनतेने बळी पडू नये, असे आवाहन जयेंद्र परूळेकर यांनी केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टंटबाजी करत नोटबंदी व जीएसटीचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणीही केली. पण यामुळे आता व्यापाºयांसह सर्वांनाच त्रास होत असून हे अन्यायकारक निर्णय सरकारने तीन महिन्यात मागे घ्यावेत, असा इशारा साईनाथ चव्हाण यांनी दिला. नोटबंदीमुळे देशभरात मृत्यूमुखी पडलेल्या १०५ जणांच्या मृत्यूला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, असा आरोपही त्यांनी केला.भाजप सरकार की मोदी सरकार? या सरकारमध्ये अब की बार मोदी सरकार असे सांगण्यात येत होते. त्यामुळे सध्याचे हे सरकार भाजाचे आहे की नरेंद्र मोदी यांचे आहे, असा टोला विकास सावंत यांनी लगावला.नोटाबंदीची वर्षपूर्ती हे वर्षश्राद्ध :काँग्रेस पदाधिकारी नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होत असून ही वर्षपूर्ती काँग्रेसच्यावतीने नोटबंदीचे वर्षश्राद्ध म्हणून साजरे केले आहे, असे काँग्रेस पदाधिका-यांनी सांगितले.राणेंनंतर काँग्रेसच्या नव्या इनिंगला सुरूवातमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले होते व आता काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीने सरकारविरोधात मोर्चा काढून जिल्ह्यातील पहिल्या इनिंगला सुरुवात केली. या मोर्च्यात जास्तीत जास्त संख्येने काँग्रेसचे जुने पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.
भूलथापा मारणा-या भाजपाचेच फक्त अच्छे दिन, जनतेला दिले बुरे दिन- विकास सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 8:17 PM