वाळू वाहतुकीवरील कारवाई अन्यायकारक
By admin | Published: December 27, 2015 10:19 PM2015-12-27T22:19:26+5:302015-12-28T00:43:40+5:30
अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार : भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे तहसीलदारांना निवेदन
कुडाळ : प्रशासन व अधिकारीवर्ग कुडाळ तालुक्यातून होणाऱ्या वाळू वाहतुकीवर अन्याय कारक कारवाई करीत असल्याने गौण खनिजाच्या बाजाराच्या दरात वाढ झाली आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारांमुळे भाजप सरकारची नाहक बदनामी होत आहे, असे निवेदन कुडाळ तहसीलदार यांना भाजप अल्पसंख्यांक सेलच्यावतीने देण्यात आले.
निवेदनात कुडाळ तालुक्यात वाळू वाहतुकीवर जिल्ह्याच्या इतर ठिकाणच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात दाम दुप्पट दंड वसुल केला जातो. खरेतर जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या १० हजार रूपये वाळूला भाव कोठेही अस्तित्वात नाही. तसेच शासकीय कामांसाठी मात्र हाच दर डी. एस. आर २५०० कसा आहे? असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे. असे असतानाच कुडाळ तालुक्यातील प्रशासन व अधिकारी मनमानी कारभार करून याठिकाणी दामदुप्पट दंडाची आकारणी करीत आहेत. नादुरूस्त झालेल्या डंपरवरही कारवाई केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाळूचा बाजारभाव निश्चित केला जात नाही. या सर्व प्रकारांमुळे वाळू व्यावसायिक व डंपर व्यावसायिक पुरते हैराण झाले आहेत. त्यांच्यामध्ये प्रशासनाविरोधात असंतोष वाढत आहे. आम जनतेलाही अर्थिक भुर्दंड पडत आहे. भाजप अल्पसंख्यांक सेल हे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष सर्फराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली गेले होते. यावेळी सचिव इफ्तेकार अत्तार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, भाजप जिल्हा सरचिटणीस चारूदत्ता देसाई, उपजिल्हाध्यक्ष राजू राऊळ, तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत, नीलेश तेंडुलकर, परवेज मुझावर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)