सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ डिसेंबरपासून लोककलांचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 03:00 PM2018-12-13T15:00:34+5:302018-12-13T15:06:18+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली व कुणकेश्वर या दोन ठिकाणी २२ डिसेंबर या पौर्णिमेच्या दिवसापासून याचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती पर्यटन महामंडळाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक दीपक माने यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक लोककलांचे दर्शन जिल्ह्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना व्हावे. त्याचप्रमाणे विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद या पर्यटक पाहुण्यांना घेता यावा. यासाठी दर पौर्णिमेच्या रात्रीला जिल्ह्यातील तारकर्ली व कुणकेश्वर या दोन ठिकाणी स्थानिक लोककलांचे आयोजन महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्यावतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २२ डिसेंबर या पौर्णिमेच्या दिवसापासून याचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती पर्यटन महामंडळाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक दीपक माने यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून या जिल्ह्यात येणाºया पर्यटकांत वर्षागणिक भर पडत आहे. येथील स्वच्छ समुद्रकिनारे, निसर्गसौंदर्य, शांततामय वातावरण यामुळे येथील पर्यटन वाढीस लागले आहे. जिल्ह्यात लाखो पर्यटक येऊ लागले आहेत. यात देशी पर्यटकांबरोबर विदेशी पर्यटकांचा भरणाही मोठ्या प्रमाणात आहे.
या पर्यटकांचे विविध कार्यक्रमातून मनोरंजन व्हावे. मनोरंजन करणाऱ्या स्थानिक कलाकारांना सुद्धा रोजगार मिळावा. या उद्देशाने पर्यटन महामंडळाने दर पौर्णिमेला सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळू लागल्यास या कार्यक्रमांचे नियमित आयोजन केले जाणार आहे, असे माने यांनी सांगितले.
पर्यटन महामंडळाची तारकर्ली व कुणकेश्वर या दोन ठिकाणी सध्या रिसॉर्ट सुरू असून त्या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रिग असते. या पर्यटकांना पर्यटन सेवा देत असतानाच स्थानिक लोककलांचे दर्शन घडवले जाणार आहे.
विशेषत: दशावतारी लोककला, धनगरी नृत्य, ठाकर लोककला, फुगड्या याबरोबर लोकसंस्कृतीचाही जागर केला जाणार आहे. तसेच जिल्ह्यातील प्रसिद्ध कवींच्या कवितांचा कार्यक्रम, लेखक साहित्यिक यांच्या मालवणी गप्पाटप्पांचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
यासाठी जिल्ह्यातील लोककला सादर करणाऱ्या दशावतारी नाट्य मंडळ, कवी, लेखक, साहित्यिक व लोककला सादर करणाऱ्या सर्वांनीच पर्यटन महामंडळाच्या येथील जिल्हा कार्यालयात ०२३६२-२२८७८५ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन ही माने यांनी केले आहे.
२२ डिसेंबरला शुभारंभ
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन महामंडळाच्यावतीने दर पौर्णिमेच्या रात्री तारकर्ली, कुणकेश्वर येथील रिसॉर्टवर स्थानिक लोककला सादर करण्याचे कार्यक्रम करण्यात येणार असून या कार्यक्रमांचा शुभारंभ २२ डिसेंबर रोजी पौर्णिमेच्या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते त्यांच्या गजल कार्यक्रमाने केला जाणार आहे.
सध्या वेंगुर्ला -सागरेश्वर आणि देवगड -मिठबाव येथेही पर्यटन महामंडळाचे तंबू निवास बांधण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर त्या ठिकाणी ही लोककला सादरीकरणाचे कार्यक्रम केले जाणार आहेत. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून भविष्यात शुल्क घेऊन हे कार्यक्रम आयोजित केले जातील. त्यातून स्थानिक कलाकारांना रोजगार मिळू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील लोककला सादर करणाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन पर्यटकांचे मनोरंजन करावे, असे आवाहन पर्यटन महामंडळाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक दीपक माने यांनी केले आहे.
पर्यटन स्थळ सुरक्षिततेसाठी प्रयत्न
दरम्यान, जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत असून कोकण ग्रामीण पर्यटन कार्यक्रमातून सागर रक्षक नेमण्यात आले आहेत. तसेच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी वॉच टॉवर, मोबाईल व्हॅन याद्वारे गस्त घालून पर्यटकांना धोक्याचा इशारा देणे, आदी उपाययोजना करण्यात आल्याची माहिती माने यांनी यावेळी दिली.