अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकू, ओटवणे ग्रामसेविकेची बदली करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:51 PM2019-03-01T12:51:24+5:302019-03-01T12:53:06+5:30
ओटवणे ग्रामसेविका मयुरी बांदेकर हिच्या अकार्यक्षम आणि अरेरावी कामकाजाबाबत प्रशासनाकडे तक्रार करून देखिल तिच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. अशा ग्रामसेविकेला प्रशासन पाठीशी घालून ओटवणे ग्रामपंचायतीवर लादण्याचा प्रयत्न करीत असेल तर ओटवणे ग्रामपंचायतीला टाळे ठोकून कारभार बंद करू असा इशारा ओटवणे सरपंच उत्कर्षा गावकर व सदस्यांनी निवेदनाद्वारे दिला.
सावंतवाडी : ओटवणे ग्रामसेविका मयुरी बांदेकर हिच्या अकार्यक्षम आणि अरेरावी कामकाजाबाबत प्रशासनाकडे तक्रार करून देखिल तिच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. अशा ग्रामसेविकेला प्रशासन पाठीशी घालून ओटवणे ग्रामपंचायतीवर लादण्याचा प्रयत्न करीत असेल तर ओटवणे ग्रामपंचायतीला टाळे ठोकून कारभार बंद करू असा इशारा ओटवणे सरपंच उत्कर्षा गावकर व सदस्यांनी निवेदनाद्वारे दिला.
ओटवणे येथील विद्यमान कार्यरत ग्रामसेविका मयुरी बांदेकर हया मुख्यालयी न राहणे, सरपंच यांना चुकीची प्रशासकीय माहिती देऊन विकासकामे रखडविणे, सरपंच सदस्य तथा ग्रामस्थांशी उद्धट वर्तणूक करणे, गावात राजकीय दृष्टिकोन ठेवून कामे करणे व ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांत वाद निर्माण करणे, सभेतील ठरावांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे, वारंवार सरपंचांना माहिती न देता गैरहजर राहणे, करवसुलीत टाळाटाळ करणे अशा प्रकारचे गंभीर आरोप सदर निवेदनात केले आहे.
ग्रामसेविका पदाचा गैरवापर करीत आहे.त्यामुळे अशा अकार्यक्षम आणि बेजबाबदार ग्रामसेविकेमुळे गावाच्या विकासात मोठी अडचण होत असून ग्रामसेविका मयुरी बांदेकर यांची तात्काळ बदली व्हावी अशा प्रकारचा मासिक सभेचा ठराव देखील ओटवणे सरपंच सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सादर केला.
यावेळी सरपंच उत्कर्षा गावकर, उपसरपंच उज्वला बुराण, महेश चव्हाण, गुंडू जाधव, रत्नमाला गावकर, समीक्षा गावकर, दिशा गावकर, प्रमोद गावकर, संजय कविटकर, रमेश गावकर, विशाल गावकर आदी उपस्थित होते.
सीईओकडे तक्रार दाखल
याबाबत यापूर्वी देखील मुख्यकार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग तसेच गटविकास अधिकारी सावंतवाडी यांच्य कडे तक्रार करून देखिल कोणतीच कारवाई झाली नसल्याचे सरपंच आणि सदस्यानी सांगितले.त्यामुळे प्रशासनाने त्या ग्रामसेविकेला पाठीशी न घालता तात्काळ ओटवणे ग्रामपंचायतमधून बदली करावी अन्यथा ओटवणे ग्रामपंचायतीला टाळे ठोकून कारभार बंद करू व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना गट विकास अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनात दिला आहे.