हर्णैने अडवले पाजपंढरीचे पाणी
By admin | Published: December 24, 2014 10:06 PM2014-12-24T22:06:57+5:302014-12-25T00:16:54+5:30
दापोली तालुका : वीजबिल न भरल्याची शिक्षा निष्पाप ग्रामस्थांना, पाण्यासाठी आतापासूनच वणवण
शिवाजी गोरे -दापोली -कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो. मात्र, योग्य नियोजन न झाल्याने धो-धो पडणाऱ्या पावसाचे पाणी अल्पावधीतच समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे सर्वाधिक पाऊस पडूनसुद्धा कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य कायम आहे. दापोली तालुक्यातील पाजपंढरी या गावच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. हर्णै ग्रामपंचायतीने वीजबिल न भरल्याने या योजनेची वीजजोडणी तोडण्यात आली आहे. एकत्रित योजना राबवल्याने त्याचा सर्वाधिक फटका पाजपंढरीला बसला आहे.
पाजपंढरी, हर्णै, अडखळ आणि शिवाजीनगर या चार गावांसाठी बांधतिवरे नदीवर नळपाणी योजना राबवण्यात आली. या नळपाणी योजनेद्वारे संबंधीत चार गावांना मुबलक पाणी देण्यात येईल, असे स्वप्न दाखवण्यात आले होते. नव्याचे नऊ दिवस हे स्वप्न सत्यातही उतरले. मात्र, २० किलोमीटरवरुन आणण्यात आलेल्या या नळपाणी योजनेत अनेक अडचणी आहेत. मुळातच चार गावांची ही योजना आहे. त्यामुळे चारही गावांनी मिळून या नळपाणी योजनेचा सर्व देखभाल खर्च उचलायचा आहे. चार गावांपैकी एकाही गावाने नळपाणी योजनेचे वीजबिल वेळेत न भरल्यास वीज कनेक्शन तोडले जाते. त्यामुळे नळाला पाणी येत नाही. वीज कनेक्शन तोडल्यास त्याचा सर्वाधिक फटका पाजपंढरी या गावाला बसतो. तसेच बांधतिवरे नळपाणी योजनेचे सर्वांत कमी पाणी पाजपंढरी याच गावाला मिळते. लांबवरुन पाणी आणल्याने या योजनेची पाणीपट्टीसुद्धा जास्त आहे. त्यामुळे त्यांना ही योजना महागडी आहे. पम्प जळणे, पाईप लिकेज होणे, वीज गायब होणे, विजेचा बिघाड यामुळे या योजनेत नेहमीच विघ्न येत आहेत. बांधतिवरे नळपाणी योजनेचे पाणी गावात आल्याचे समाधान कमी, परंतु विघ्न अधिक असेच म्हणण्याची वेळ पाजपंढरीवासियांवर आली आहे.
पाजपंढरी या गावाच्या उशाला अथांग समुद्र किनारा आहे. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाची भौगोलिक रचना दैनंदिन जीवनाला थोडीशी अडचणीची आहे. डोंगर व समुद्राच्या मध्यभागी निमुळत्या भागात गाव वसलेला आहे. भौगोलिक रचनाही विचित्र आहे. पाजपंढरी गावात विहिरी आहेत. मात्र, विहिरीला पाणीच नाही. तसेच काही विहिरीत केवळ मचूळ पाझर फुटतो. त्याच विहिरीवर २४ तास रांगा लावून पाणी भरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.
पाजपंढरी गावात चार-पाच विहिरी आहेत. परंतु त्या कोरड्या पाडल्या आहेत. या गावाकरिता स्वतंत्र नळपाणी योजनेची गरज आहे. गावातील कोणत्याही विहिरीत आता पाणी उरलेले नाही. पर्यायी नळपाणी योजनाही नाही. त्यामुळे त्यांची मदार केवळ एकाच नळपाणी योजनेवर आहे. त्या नळपाणी योजनेत काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्यांना पाणीटंचाईला नेहमीच सामोरे जावे लागते. हर्णै - अडखळ या गावातून पाणी आणावे लागते.
पाजपंढरी गावात समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारा प्रकल्प हवा आहे. तसे झाले तर समुद्राच्या पाण्यापासून मुबलक गोड पाणी त्यांना मिळू शकते किंवा हर्णै गावाला बांधतिवरे या नळपाणी योजनेप्रमाणेच खेम धरणावरील पर्यायी नळपाणी योजना आहे. तशा स्वरुपाची पाजपंढरी गावासाठी स्वतंत्र नळपाणी योजना राबवणे गरजेचे आहे. पाजपंढरी गाव केवळ एकाच नळपाणी योजनेवर अवलंबून असल्याने त्यात बिघाड झाल्यास येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
बांधतिवरे धरणाचे पाणी कमी झाल्यावर एप्रिल - मे महिन्यात पाजपंढरीला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी केवळ एका कुटुंबाला केवळ चारच हंडे पाणी मिळते. त्यामुळे पाण्याची वणवण कायम आहे.
पाजपंढरी गाव कोळी बांधवांचे गाव आहे. या गावाला वारंवार पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने मासे विक्रीतून उदरनिर्वाह करण्याचे काम सोडून केवळ पाण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागते. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांचे हाल होता. तसेच विकतचे पाणीसुद्धा घ्यावे लागते. एका बॅरलला २०० रुपये मोजावे लागते. काही वेळा एका हंड्याला २० ते ३० रुपये मोजण्याची वेळ येते. मात्र, पाण्यासाठी गरीब कुटुंबाने एवढे पैसे आणायचे कुठून, हा प्रश्न त्यांना वारंवार भेडसावतो आहे.
बांधतिवरे नळपाणी योजनेचे वीजबिल न भरल्याने गेल्या १५ दिवसांपासून गावात पाणी येत नाही. थकीत वीजबिलामुळे योजनेचे वीज कनेक्शन बंद करण्यात आल्याने पाजपंढरी येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. दिवस-रात्र पाण्यासाठी भटकंती करुन पाणी मिळवावे लागते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. हर्णै ग्रामपंचायतीचे पाच महिन्यांचे वीजबिल थकल्याने वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. पैसे भरल्याशिवाय कनेक्शन जोडण्यात येणार नाही, असा महावितरणने पवित्रा घेतल्याने त्याची शिक्षा पाजपंढरी गावाला भोगावी लागत आहे. पाजपंढरी गावची काही चूक नसताना पाण्यासाठी त्यांना मरणयातना सहन कराव्या लागल्या. हर्णैसाठी खेम धरणाची पर्यायी योजना आहे. त्यामुळे वीज कनेक्शन तोडल्याचा फटका पाजपंढरीलाच बसला आहे.
रोज रोज कसरत तारेवरची...
योजना लांबवरून आणण्यात आल्याने पाणीपट्टीही जास्त.
पाजपंढरी ग्रामस्थांसाठी पाणी योजना महागडी.
बांधतिवरे नळपाणी योजनेचे पाणी गावात आल्याने समाधान कमी, विघ्न जास्त.
पाजपंढरीत असलेल्या विहिरींना पाणीच नसल्याने हाल.
पाजपंढरी गावाची तहान भागवण्यासाठी नळपाणी योजनेचाच स्रोत.
पंधरा दिवसांपासून पाणी नसताना या गावाची कोणीही दखल घेतली नाही. टँकरने पाणी पुरवठा करण्याची गरज होती. किंवा वीजबिल भरण्यासाठी मुदत देणे गरजेचे होते. कोणतीही पूर्वकल्पना न देता पाणी बंद करुन या लोकावंर महावितरण अन्याय करत आहे. चारही गावांची नळपाणी योजना सुरळीत राहण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या सुकाणू समितीच्या प्रयत्नाने थकीत वीजबिल भरुन हक्काचे पाणी एक-दोन दिवसात देण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता या समितीच्या प्रयत्नांना कितपत यश मिळते, याकडे लक्ष लागले आहे.
हर्णै, पाजपंढरी, अडखळ आणि शिवाजीनगर या चार गावांतील २० हजार लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना कार्यान्वित केली. मात्र, योजना हस्तांतरित करण्यात आलेली नाही. त्यामुळे वारंवार पाईप फुटणे, पंप बंद पडणे, अशा घटना घडत आहेत. या योजनेचे काम अपूर्ण आहे. याकडे जीवन प्राधिकरण दुर्लक्ष करत आहे.
-महेश पवार, सरपंच, हर्णै.
लाख रुपयांचं बिल
बांधतिवरे या चार गावांच्या नळपाणी योजनेचे बिल लाखाच्या पटीत येऊ लागले आहे. पाजपंढरी गावाने वीजबिल भरले. मात्र, या योजनेचे थकीत बिल हर्णै ग्रामपंचायतीने न भरल्याने कनेक्शन कट करण्यात आले आहे. त्यामुळे चूक कुणाची शिक्षा कुणाला, असा प्रकार पाजपंढरीच्या नशिबी वारंवार येऊ लागला आहे.
पाजपंढरी गावातील ग्रामस्थांनी याबाबत प्रशासनाकडे संपर्क साधायला हवा होता. मात्र, त्यांनी तो साधला नाही. कारण पाणीटंचाईच्या काळात या गावाला प्रशासन पाणी पुरवते. सध्या पाणीटंचाई जाणवत असल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आलेली नाही. तरीही याठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येईल.
- गीतांजली वेदपाठक, सभापती
विहिरी आहेत पण पाण्याने तळ गाळला आहे. उशाला अथांग समुद्राचे पाणी आहे. पण, त्या पाण्याने तहान शमत नाही. त्यामुळे पाण्यासाठी दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. असे असताना राजकीय मंडळी व प्रशासन मात्र नेहमीच मूग गिळून गप्प बसते. पाणीच नाही तर जीवन जगायचे कसे, हा प्रश्नच त्यांना भेडसावत आहे. गावातील सर्वच विहिरीनी तळ गाठला असताना त्याच तळाला थोडेसे पाझरुन साठलेले गढूूळ पाणी तहान भागविण्यासाठी मिळवावे लागत आहे.