शांततेत चाललेले आंदोलन भडकवू नये.
By admin | Published: December 24, 2014 09:19 PM2014-12-24T21:19:39+5:302014-12-25T00:13:35+5:30
कमलताई परूळेकर : अंगणवाडी सेविकांना बजावलेली नोटीस मागे घेण्याची मागणीे
सिंधुदुर्गनगरी : मासिक प्रगती अहवाल दिला नाही म्हणून प्रशासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेली कारणे दाखवा नोटीस प्रथम मागे घ्या. नंतरच अहवाल देण्याबाबतचा निर्णय घेऊ, असा इशारा देत शांततेत चाललेले आंदोलन सभापती स्नेहलता चोरगे यांनी भडकवू नये. त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी दिला आहे.
शासनाने मंजूर केलेले जादा मानधन मिळावे या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मासिक प्रगती अहवाल बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ज्या तालुक्यांचे अहवाल आले नाहीत, अशा अंगणवाडी सेविकांना प्रशासनाने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महिला व बालविकास समितीच्या बैठकीत सभापती स्नेहलता चोरगे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रशासनास वेठीस धरून आंदोलन करू नये, अन्यथा कारवाई करावी, असे आदेश दिले होते.
याबाबत कमलताई परुळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे खरपूस समाचार घेतला आहे. ज्यांच्यावर अन्याय होतो आणि ज्यांच्यामध्ये हिंमत असते तेच आंदोलन करतात. तेव्हा शांततेत चाललेले आंदोलन सभापती चोरगे यांनी भडकविण्याचा प्रयत्न करू नये. गेले सहा महिने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळत नाही. प्रवास बिले तीन वर्षे प्रलंबित आहेत. आहाराची बिलेही रखडवून ठेवली जातात. याकडे समिती सदस्य असताना सभापती चोरगे यांनी लक्ष दिले असते, तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळच आली नसती. (प्रतिनिधी)
आंदोलन प्रशासनास जाग आणण्यासाठी
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन आणि शासन दुर्लक्ष करीत असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी तसेच आजपर्यंतच्या अनुभवानुसार नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, यासाठी मासिक प्रगती अहवाल बंद आंदोलन करावे लागले आहे. प्रशासनास वेठीस धरण्यासाठी आमचे आंदोलन नसून ते जाग आणण्यासाठी आहे. तेव्हा सभापती चोरगे यांनी आमचे आंदोलन भडकवू नये, असा इशारा कमलताई परुळेकर यांनी दिला आहे.