तळेरे : देवगड तालुक्यातील फणसगावमधील महिलांनी गावात दारूबंदीच्या जनजागृतीसाठी भव्य रॅली काढली. यामध्ये सुमारे १०० महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या रॅलीचे नेतृत्व महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षा वंदना नरसाळे यांनी केले.दारू व्यवसायामुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्यामध्ये काहीही दोष नसताना महिलांना त्याची आयुष्यभर शिक्षा भोगावी लागते. अलीकडे तरुण पिढी ही या व्यसनाकडे वळली असून यामुळे समाजाचे व गावाचे नुकसान होत असल्याने फणसगावातील महिलांनी एक पाऊल पुढे टाकून या विरुद्ध बंड पुकारले. याबाबतचे लेखी निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.या रॅलीत सरपंच सायली कोकाटे, राजू जठार, उदय पाटील, बंड्या नारकर, मंगेश मणचेकर, दयानंद कदम, वसंत आडिवरेकर, महेश पडवळ, जितेंद्र तेली, ग्रामपंचायत सदस्य बाबू आडिवरेकर, सिद्धी पाटील, सरिता आग्रे, सुजाता पेंडुरकर, कृष्णा नर यांच्यासह असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.तसेच राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी व विजयदुर्ग पोलीस स्थानकाचे कोळी यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायतीकडून या रॅलीची सुरुवात होऊन बौद्धवाडी, त्यानंतर कोकाटेवाडी, पुढे कुंभारवाडी आणि पुन्हा ग्रामपंचायत कार्यालय अशी रॅली काढण्यात आली.
यातून दारूबंदी होण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी दारूबंदी होण्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी विविध घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत महिलांचा मोठ्या संख्येने असलेला सहभाग महत्त्वाचा होता. दारूबंदीसाठी टाकलेले पहिले पाऊल यशस्वी झाले आहे.