शिक्षकांमध्ये परिवर्तनाची ताकद
By admin | Published: April 2, 2017 10:28 PM2017-04-02T22:28:29+5:302017-04-02T22:28:29+5:30
सतीश सावंत : मराठा समाज प्राथमिक शिक्षकांचा मेळावा, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
कणकवली : देशाचा भावी नागरिक घडविण्याचे बहुमूल्य कार्य शिक्षक करत असून, समाज परिवर्तन घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये असल्याने शिक्षकांनी संघटित व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी आंब्रडसारख्या मतदारसंघात शिक्षक तसेच बँक अधिकाऱ्यांमुळे मी निवडून आलो असल्याचे सांगत, आपण सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्यास मराठा समाजाची उन्नती होईल, असे सांगितले. कणकवलीतील मराठा मंडळ सभागृहात शनिवारी झालेल्या मराठा समाजाच्या प्राथमिक शिक्षकांच्या मेळाव्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषद सदस्या सावी लोके, श्रिया सावंत, स्वरूपा विखाळे, संजय देसाई, तसेच व्ही. डब्लू. सावंत, दत्ता सामंत, पंचायत समिती सदस्य राधिका सावंत, महेश लाड, सुभाष सावंत, किसन दुखंडे, सेवानिवृत्त शिक्षक व मार्गदर्शक अशोक तळेकर, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी सूर्यकांत तळेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्याचे उद्घाटन सतीश सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. सतीश सावंत पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी जिल्हा बॅँकेमार्फत कर्ज योजना उपलब्ध आहे. यासाठी मुलांच्या पालकांच्या नावावर जमिनीचा सात-बारा असल्यास तो तारण न ठेवता दोन जामीनदार उपलब्ध केल्यास चार लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. तसेच चालू वर्षात बँकेकडून ६.५ लाख रुपयांचे कर्ज विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ९ टक्के दराने देण्यात आले आहे. तसेच एमपीएससी, युपीएससी परीक्षेकरिता पुस्तके, मार्गदर्शन वर्गासाठी केंद्र सुरू करण्याचा संचालक मंडळापुढे प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
ते म्हणाले, आपल्या समाजाला आर्थिक सुलभता येण्यासाठी आपण संघटित होऊन कार्य करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या पडीक जमिनी लागवडीखाली येण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शन करावे. त्यामुळे मराठा व इतर समाजही प्रगतिपथावर जाईल.
शिक्षकांनी समाजासाठी जास्तीत जास्त उपक्रम राबवावेत. त्यासाठी लागेल ते सहकार्य आम्ही करू. आपल्यावर अन्याय होत असल्यास जरूर आम्हाला हाक द्या. आपल्या समस्या सोडवून तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले. प्रास्ताविक किसन दुखंडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्याम सावंत यांनी केले. (वार्ताहर)
पुढे जाणाऱ्याला प्रोत्साहन द्या
मेळाव्याचे मार्गदर्शक सूर्यकांत तळेकर म्हणाले, शिक्षकांप्रती मला आत्मीयता आहे, परंतु मराठा समाजाची योग्यता असूनही केवळ आरक्षणांमुळे समाजातील व्यक्ती मागे पडत आहेत. त्यासाठी सर्वांनी मिळून आवाज उठविण्याची गरज आहे. एकमेकांचे पाय खेचण्याची वृत्ती कमी करून पुढे जाणाऱ्याला प्रोत्साहित केल्यास आपले समाज बांधवही उच्च पदावर कार्यरत राहतील, असे त्यांनी सांगितले.