सावंतवाडी : कोणतीही मोठी दरवाढ न करता सावंतवाडी नगरपालिकेने आपला २९ कोटी शिल्लकी अर्थसंकल्प सादर केला. पाणीपट्टी आरोग्य तसेच घरपट्टी आदींना कुठेही हात न लावता तसेच नागरिकांवर या अर्थसंकल्पाचा कोणताही कराचा भार येणार नाही. याची पुरेपुर काळजी नगरपालिकेने घेतली आहे. अर्थसंकल्पानंतर सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या सर्वच नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दर्शविला. दरम्यान शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईसाठी २५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.सावंतवाडी नगरपालिकेची अर्थसंकल्पीय बैठक नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी सकाळी येथील लोकमान्य टिळक सभागृहात पार पडली.
यावेळी मुख्याधिकारी जंयत जावडेकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर, दिपाली सावंत, दिपाली भालेकर, समृध्दी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, राजू बेग, सुधीर आडिवरेकर, सुरेंद्र बांदेकर, उदय नाईक, डॉ.जयेंद्र परूळेकर आदी उपस्थित होते.सावंतवाडी नगरपालिकेची प्रारंभिक शिल्लक ही २८ कोटी ४७ लाख ९३ हजार एवढी होती. तर एकूण महसुली जमा ६८ कोटी ४६ लाख ४२ हजार एवढी असून, पालिकेचा खर्च ८४ कोटी ५२ लाख ७० हजार एवढा आहे. चालूवर्षी पालिकेने नगरोत्थान योजनेसाठी २१ कोटीची तर चौदाव्या वित्त आयोगासाठी ३ कोटी ५० लाख वैशिष्टपूर्ण अनुदान, ५ कोटी अल्पसंख्यांक, १० लाख रस्ते विकास, सर्वसाधारणपणे ३५ लाख रस्ते विकासविशेष अनुदान, २ कोटी दलित वस्ती सुधारणा, ५० लाख नाविन्य पूर्ण योजनेसाठी, १ कोटी ४ लाख प्रादेशिक पर्यटन योजना, घनकचरा व्यवस्थापन ९० लाख, अग्निशमन साठी म्हणजेच फायर स्टेशल बांधणे तसेच नवीन बंब खरेदी करण्यासाठी २ कोटी रूपयांची तरतूद केली आहे.या शिवाय डिसेंट्रलाईज सांडपाणी प्रकल्पास प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच गाडगेबाबा भाजी मंडई बांधकामसाठी २५ कोटी, मटण मार्केट बांधकाम करणे २ कोटी घनकचरा व्यवस्थापन २ कोटी ६४ लाख, बोटक्लब २५ लाख खेळपट्टी बनविण्यासाठी २० लाख, शैक्षणिक उपक्रमासाठी २ लाख, दिव्यांग व अपंग योजनासाठी १० लाख, घंटागाडी खरेदी ४ लाख, वाहने मशिनरी खरेदी ३५ लाख, पाणी पुरवठा योजनेसाठी ७० लाख रूपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्या िशवाय जन्म मृत्यू दाखला दुरूस्ती १० रूपयांवरून थेट १०० रूपये करण्यात आली आहे.सावंतवाडी नगरपालिकेने फिरत्या व्यापाऱ्याना ५० रूपये कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जिमखान्यावरची खेळपट्टी ही अत्याधुनिक होणार आहे. नवीन पाण्याची योजना पालिका आणणार आहे, असे यावेळी जाहीर करण्यात आले. त्यामुळे कोणतीही दरवाढ न आकारता प्रथमच पालिकेने हा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पानंतर सर्व सदस्यांनी एकमताने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. तर नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी व्यायाम शाळेची फी ५०० रूपये करण्यावर आक्षेप घेतला. मात्र नगराध्यक्ष साळगावकर यांनी ही फि व्यायाम शाळा अद्यावत केल्यावर आकारली जाईल, असे सांगितले.सलग आठवा अर्थसंकल्प मांडण्याचा माननगराध्यक्ष बबन साळगावकर यांना सलग आठवा अर्थसंकल्प मांडण्याचा मान मिळाला आहे. यावेळी नगरसेवक राजू बेग यांनी आता तुम्ही राज्याचा अर्थसंकल्प मांडा, असे सांगत कौतुक केले. तर नगराध्यक्ष साळगावकर यांनीही आपणास हा सलग आठव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याचा मान दिल्याबद्दल नागरिकांचे आभार मानले.