वेंगुर्लेत कोरेगाव-भीमा घटनेविरोधात निषेध रॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 06:02 PM2018-01-16T18:02:30+5:302018-01-16T18:52:34+5:30
कोरेगांव भिमा येथील जातीय दंगली उसळली यांचा निषेध नोंदवण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील परिवर्तनवादी संघटना व वेंगुर्ला तालुका निषेध मोर्चा कृती समितीच्यावतीने आज वेंगुर्ले शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला.
वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - कोरेगांव भिमा येथील जातीय दंगली उसळली यांचा निषेध नोंदवण्यासाठी वेंगुर्ला तालुक्यातील परिवर्तनवादी संघटना व वेंगुर्ला तालुका निषेध मोर्चा कृती समितीच्यावतीने आज वेंगुर्ले शहरात निषेध मोर्चा काढत मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना तात्काळ अटक कराच्या घोषणा देत जातीय दंगली उसळणा-यांवर काडक कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन मुख्यंमत्री महाराष्ट्र शासन यांना देण्यासाठी वेंगुर्ले तहसिलदार यांना सादर केले.
कोरेगांव भीमा येथे १ जानेवारी रोजी मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी जातीय दंगल घडवून दलित समाजातील बांधवाना मारहाण केली. मराठा व दलित यांच्यामध्ये वाद घडवून धार्मीक व जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज वेंगुर्ला तालुका निषेध मोर्चा कृती समितीच्यावतीने आनंदवाडी ते वेंगुर्ले तहसिलदार कार्यालया पर्यंत उत्स्फुर्त मोर्चा काढत तहसिलदार यांना निवेदन सादर केले. मोर्चा तहसिलदार कार्यालयाकडे आल्यावर त्याचे सभेत रुपांत करण्यात आले. जातीय दंगली घडविणा-या मनुवादी वृत्तीचा धिक्कार करत दलीत मराठा समाजात तेड निर्माण करणा-या शक्तींपासून बहुजन समाजाने जागृत राहून एकत्रीत येऊन काम केले पाहीजे. ही दंगल घडविण्यास मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे हेच जबाबदार असून त्यांच्यावर कडक करावी करण्यात यावी. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी दंगली घडविणारे मनोहर भिडे यांना दिलेले सर्टिफिकेटस दलीत विरोधी असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थीत वक्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सामाजीक कार्यकर्ते महेश परुळेकर, वाय.जी.कदम, सावंतवाडीचे वासुदेव जाधव, भारतीय बौध्द महासंघाचे जिल्हा अध्यक्ष सत्यवान जाधव, वि.रा.आसोलकर, सौ.स्नेहल पालकर यांनी मोर्चास मार्गदर्शन केले.
वेंगुर्ले तहसिलदार शरद गोसावी यांच्याकडे शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना तात्काळ अटक करा, न्यायालयीन चौकशी आयोग ताबडतोब स्थापन करुन जलद गतिने सदर दंगलीचा तपास करावा, हया गुन्हयाची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्यात यावी, विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे संवर्धन व जतन करण्यात यावे, सरकारने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनते समोर आणावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी. या शिष्टमंडळात वेंगुर्ला तालुका निषेध मोर्चा कृती समिती अध्यक्ष सुभाष जाधव, भिवा जाधव, महेश परुळेकर, सत्यवान जाधव, वासुदेव जाधव ,माजी नगरसेवक एकनाथ जाधव, वामन कांबळे, सुचिता कदम, लवू तुळसकर, सावित्री बाई फुले महिला मंडळ अध्यक्षा सौ.सरोजनी जाधव, वृषाली जाधव आदी सह सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला येथील शेकडो आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता.