रत्नागिरी : पूर्ववैमनस्यातून आज, मंगळवारी भर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तहसील कार्यालयासमोर दोन गटांत जोरदार राडा झाला. यावेळी कुकरीसारख्या धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात सायनन रियाज काझी (३०, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) हा गंभीर जखमी झाला.त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काहीकाळ दहशतीचे, तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी सायनन काझी याने शहर पोलीस ठाण्यात पाचजणांविरोधात फिर्याद दिली आहे. हल्ला करणारा रूपेश सावंत हाही जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुसऱ्या गटाची परस्परविरोधी तक्रार दाखल करण्याचे काम शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.सायनन काझी याने दिलेल्या फिर्यादीनुसार रूपेश कमलाकर सावंत (३०, सडामिऱ्या, रत्नागिरी), जितू चव्हाण, राकेश चव्हाण, राहुल चव्हाण, दिनेश चव्हाण (सर्व रा. सोमेश्वर, ता. रत्नागिरी) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, त्यावेळी समोर असलेल्या अधिकारी व पोलिसांनी प्रथम बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप या प्रकरणात जखमी झालेल्या सनी आंबेकर याने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. याबाबत सनी आंबेकर यांने सांगितले की, गेल्याच आठवड्यात शिवाजीनगर येथील राजेश आंबेकर यांच्या हॉटेलमध्ये काही तरुणांची बाचाबाची झाली होती. त्यांनी हॉटेलमध्ये राडा केला होता. त्यावेळी तेथे असलेल्या सायनन काझी याने हे प्रकरण मिटविले होते. त्यानंतर पाचजणांविरोधात तक्रार झाली. गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात गेले. जामीन झाल्यानंतर आज ते पाचजण तहसीलदारांकडे प्रतिबंधात्मक कारवाईबाबतची पूर्तता करण्यासाठी आले होते. त्यानंतर दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली. रूपेश याने आपल्याला ठोसा मारला व तो कार्यालयाच्या आवाराबाहेर निघून गेला. त्यानंतर काही क्षणातच तो धावत पुन्हा तेथे आला. हातातील धारदार शस्त्राने तो राजेश आंबेकर यांच्यावर हल्ला करणार हे लक्षात येताच सायनन काझीने मध्येच जात तो वार आपल्यावर झेलला. त्यात सायननच्या मांडीवर आणि डोक्यावर वार झाला. तरीही सायननने प्रतिकार करीत हातानेच चाकू पकडून ठेवला. त्याचवेळी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या हल्लेखोर तरुणाचे डोके सनीने बगलेत पकडून त्याला त्याच जागी जखडून ठेवले. हा प्रकार तेथे असलेले लोक, पोलीस व अधिकारी बघत होते. त्यानंतर पोलीस पुढे आले. हल्लेखोरास आपण पकडून ठेवत आपण पोलिसांच्या ताब्यात दिले, असे सनी आंबेकर याने प्रसारमाध्यमांना सांगितले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जावसेन अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)दुचाकीवरून हलविले रुग्णालयात..या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या सायनन काझी याला तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक होते. सर्वजण बघ्याच्या भूमिकेत होते. त्यामुळे आपण आपल्या दुचाकीच्या मागील सीटवर त्याला बसवून जिल्हा रुग्णालयात आणले, असेही सनी आंबेकर याने प्रसारमाध्यमांना सांगितले.या संपूर्ण प्रकारामागे काही राजकीय धेंडांचा हात असल्याचा आरोप करीत घटनेच्या ठिकाणी काही राजकारण्यांची नावेही सनी आंबेकरने ओरडून सांगितल्याने याप्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
पूर्ववैमनस्यातून दोन गटात राडा
By admin | Published: December 23, 2014 11:39 PM