कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवली तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून रविवारी सकाळपासून अधून-मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, या पावसाने कुठेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद आपत्ती नियंत्रण कक्षात झालेली नव्हती.कणकवली तालुक्यात मागील दोन-चार दिवस जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाल्यांची पुन्हा पाण्याची पातळी वाढली आहे. यावर्षी पाऊस काहीसा उशिराने पडायला सुरुवात झाली होती. मात्र, गतवर्षीप्रमाणेच तालुक्यात पावसाने आतापर्यंत सरासरी गाठली आहे. या सातत्यपूर्ण पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.गेला आठवडाभर जोरदार पडणाºया पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत.कणकवली शहरालगत असलेल्या गडनदी व जानवली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांवर चिखलाचे पाणी उडत आहे.रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरील प्रांताधिकारी कार्यालयासमोरून जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते.
त्यामुळे या रस्त्यावरून चालताना पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच वाहन चालकांनाही वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. पाऊस थांबल्यावर येथील पाणी ओसरले. अशीच स्थिती शहरातील काही ठिकाणच्या रस्त्यांवर दिसून येत होती.वाहनचालकांना करावी लागतेय कसरतमुंबई-गोवा महामार्गावर दोन आठवड्यांपूर्वी नव्याने पावसाळी डांबरीकरण करून महामार्ग तयार केला होता. ज्याठिकाणी खड्डे पडले होते त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात महामार्गाच्या ठेकेदाराने खड्डे बुजविले होते. मात्र, दोन आठवड्यांनंतर पुन्हा महामार्गावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना या मार्गावर मोठी कसरत करावी लागत आहे. गेले दोन दिवस पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाल्याने त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून खड्डे मोठे होत आहेत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.