सत्तेसाठी राणे चुकीच्या गाडीत बसत गेले : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 02:29 PM2019-08-05T14:29:19+5:302019-08-05T14:31:39+5:30
अनेक लोक चुकीच्या गाडीत बसतात. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली नसती तर ते आज मोठे नेते असले असते. सत्तेच्या मागे धावत राहिल्याने राणे अडचणीत आले आहेत. लोकसभा निवडणूक लढवून त्यांनी स्वत:चे ५० टक्के नुकसान करून घेतले आणि आता विधानसभेला ते उभे राहिले तर त्यांची संपूर्ण राजकीय कारकिर्दच संपून जाईल, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
कुडाळ : अनेक लोक चुकीच्या गाडीत बसतात. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडली नसती तर ते आज मोठे नेते असले असते. सत्तेच्या मागे धावत राहिल्याने राणे अडचणीत आले आहेत. लोकसभा निवडणूक लढवून त्यांनी स्वत:चे ५० टक्के नुकसान करून घेतले आणि आता विधानसभेला ते उभे राहिले तर त्यांची संपूर्ण राजकीय कारकिर्दच संपून जाईल, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
आंबोलीतील कबुलायतदार गावकर प्रश्नी मंत्री दीपक केसरकर यांची अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासमवेत कुडाळ एमआयडीसी येथे बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, मंदार शिरसाट, नागेंद्र परब आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर यांना राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षातून बाहेर पडत असल्याबाबत विचारले असता, मी त्या पक्षात नाही, मग कसे बोलू? असे सांगत त्यांनी विषयाला बगल दिली. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गृहखात्यावर कोणतीही टीका केली नसल्याने त्यावर भाष्य करणार नाही. शरद पवार हे मोठे नेते आहेत, असे यावेळी केसरकर यांनी सांगितले.
महामार्गाच्या प्रश्नावर अनेक बैठका घेऊनही आमदार नीतेश राणे आले नाहीत व प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर आंदोलन केले, ते योग्य नाही, असे सांगत आजही कणकवलीतील एक हजार दूरध्वनी बंद आहेत. दूरध्वनी दुरुस्त करण्यास दिले जात नाहीत ही दादागिरी आहे, असे यावेळी मंत्री केसरकर म्हणाले. आता राणे यांनी हे थांबविले पाहिजे, असे सांगत राणे हे सत्तेसाठी चुकीच्या गाडीत बसत गेल्याने त्यांचे नुकसान झाले. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून स्वत:चे ५० टक्के नुकसान केले आहे. आता विधानसभा निवडणूक लढविली तर राजकीय कारकिर्दच संपून जाईल, असे यावेळी मंत्री केसरकर म्हणाले.
माझे राणेंशी व्यक्तिगत वैर नाही मात्र त्यांच्या प्रवृत्तीला विरोध आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्यामागे काही तत्त्व होते. पण राणेंचे पक्ष सोडण्यामागे सत्तेचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले. राणेंच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला मुख्यमंत्री का जात नाहीत हे तेच उत्तर देऊ शकतील, असे सांगत युतीचे यावेळी २२० उमेदवार निवडून येतील, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख म्हणून संजय पडते हे चांगले काम करतील, अशी माझी अपेक्षा आहे. ते संघटनेला न्याय देतील. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करतील, असे यावेळी केसरकर यांनी सांगितले. तसेच माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केलेल्या टीकेवर त्यांनी पडते यांची बाजू घेत पडतेंना पूर्वीच्या नेत्यांनी दगड मारण्यास सांगितले, त्यात त्यांचा काय दोष? असे सांगत आता शिवसेनेत तसे होणार नाही. शिवसेनेचे नेतृत्व शांत, संयमी असल्याचे केसरकर यांनी सांगितले. नगराध्यक्ष बबन साळगावकर माझे गुरूबंधू आहेत. त्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देणार नाही, असेही ते म्हणाले.
बाहेरून आलेल्या व्यक्तीला सावंतवाडी स्वीकारत नाही
सावंतवाडी विधानसभा मतदार संघात बाहेरून आलेली व्यक्ती चालत नाही, हा सावंतवाडीचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री राणे यांनी कोणालाही माझ्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न केला तरी जनता त्यांना स्वीकारणार नाही. मी मंत्री म्हणजे सावंतवाडी मतदार संघातील जनताच मंत्री असल्यासारखे आहे, असे सांगत मी एकदा जनसंवाद सुरू केला की सर्व जण बाहेर जातील, असा टोलाही दीपक केसरकर यांनी कोणाचेही नाव न घेता हाणला.