सावंतवाडी दोडामार्गमधील उर्वरित १० गावे इको सेन्सिटिव्ह यादीत - स्टॅलिन दयानंद
By अनंत खं.जाधव | Published: April 16, 2024 04:44 PM2024-04-16T16:44:51+5:302024-04-16T16:45:04+5:30
२५ गावाबाबत निर्णय जाहीर, ३२ मायनिंग प्रकल्प बंद होणार: शेतकऱ्यांकडून सत्कार
सावंतवाडी : दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील २५ गावे “इको सेन्सेटिव्ह झोन” म्हणून जाहीर करण्यात आली आहेत आता उर्वरित १० गावे ही इनोव्हेटिव्ह म्हणून जाहीर करा त्यामुळे ३२ हून अधिक मायनिंग प्रकल्प बंद होणार आहेत.असा विश्वास वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी व्यक्त केला.
आपण अर्धी लढाई जिंकली आहे. पण न्यायालयाच्या निर्णया ची सरकारकडून योग्य ती अमलबजावणी होत नसल्यानेच शेकडो एकर जमिनीत वृक्षतोड सुरू असा दावा ही दयानंद यांनी केला. १४ वर्षांच्या लढाईला यश मिळाल्याने तसेच सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील 25 गावे सेन्सेटिव्ह झोन म्हणून जाहीर झाल्यानंतर प्रथमच सावंतवाडीत स्टॅलिन दयानंद यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी डॉ. जयेंद्र परुळेकर, संदिप सावंत, नंदकुमार पवार अस्मीता एम के यांच्यासह दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
दयानंद म्हणाले, जो काही विजय मिळाला आहे तो ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे मिळाला आहे. त्यामुळे यापुढे ही अशाच प्रकारे एकत्र राहणे गरजेचे आहे. जमिनी न विकता या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून विकास व्हावा जेणे करुन मायनिंगसाठी जमिनी विकून पैसा मिळणार नाही तितका पैसा पर्यटनातून मिळू शकतो, असा त्यांनी दावा केला. त्याच बरोबर आमची लढाई यापुढे सुध्दा चालू राहणार आहे. आत्ता आम्ही जिल्हाधिकारी आणि वनअधिकार्यांच्या विरोधात आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत.
सावंत म्हणाले, या ठिकाणी वनविभाग आणि जिल्हा प्रशासन जिल्ह्यात असलेल्या वाघांच्या अस्तित्वाबाबत सतर्क नाही. वाघाच्या नोंदी असलेले अनेक वर्षाचे रेकॉर्ड वनविभागाच्या कस्टडी मधून चोरीला गेले आहे. त्यामुळे हा प्रकार जाणीवपुर्वक झाला की केला गेला? याची माहिती घेणे महत्वाचे ठरणार आहे.
परुळेकर म्हणाले, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र, या ३ राज्यात तब्बल ५० वाघ असल्याचा दावा याबाबत अभ्यास करणार्या सामाजिक संस्थांनी केला आहे असे असताना शासनाकडुन ही माहिती लपविली जाते हे दुदैवे आहे, असा आरोप त्यांनी केला. अर्धी लढाई आम्ही जिंकलो आहोत. त्यामुळे येणार्या काळात येथील जमिनी विकल्या जाणार नाहीत. त्याच बरोबर प्रदुषणकारी प्रकल्प येणार नाहीत यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट महत्वाची
सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यातील अनेक ग्रामस्थ हे पद्रूषण कारी प्रकल्पाच्या विरोधात आहेत या ग्रामस्थांकडून मोठी साथ मिळाली त्यामुळे यावर अभ्यास करून अनेक मुद्दे न्यायालयात ठळक पणे मांडता आले त्याचेच हे यश असल्याचे स्टॅलिन दयानंद म्हणाले.