कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेमडेसीवीर इंजेक्शन दिली आहेत. कोरोना संसर्गामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णासाठी उपयुक्त ठरणारे आणि त्या रुग्णांचे जीव वाचविणारे हे प्रभावी औषध आहे.या इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा आहे. अशा स्थितीत सिंधुदुर्गातील रुग्णांना ही इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा आरोग्य प्रशासनाने राणे यांचे आभार मानले. यापूर्वी आमदार नीतेश राणे यांनी रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिली होती.
रेमडेसीवीर इंजेक्शनची जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेली आहे. मुंबईतसुद्धा हे इंजेक्शन मिळाले नसल्याने अनेकांना यापूर्वी प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या रुग्णाला हे इंजेक्शन दिल्यास रुग्णाचा मृत्यू टळतो. त्यामुळेच कोरोनामुळे आपल्या जिल्ह्यातील कोणाचाच बळी जाऊ नये म्हणून नारायण राणे यांनी जिल्ह्यासाठी अशी इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत.सोमवारी ही इंजेक्शन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.