हीच का उपकाराची परतफेड? नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 05:21 PM2021-06-17T17:21:57+5:302021-06-17T17:22:44+5:30
शासनाच्या हलगर्जीपणामुळे व अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे आतापर्यंत सिंधुदुर्गात तब्बल ८६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि एकेकाळचे निष्ठावंत शिवसैनिक असेलल्या नारायण राणे यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा टीका केली आहे. कोरोना काळात सिंधुदुर्गावर वैद्यकीय सुविधा पुरविण्यात अन्याय झाल्याचा आरोप राणेंनी केला आहे. राणे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. कोलगाव ग्रामपंचायततर्फे तयार करण्यात आलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय विलगीकरण कक्षाचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले.
शासनाच्या हलगर्जीपणामुळे व अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे आतापर्यंत सिंधुदुर्गात तब्बल ८६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात हॉस्पिटल आहेत; पण डॉक्टर नाहीत, बेड नाहीत, ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा आहे. दातांचे व त्वचेचे डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. याची राज्य शासनाला लाज कशी वाटत नाही, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे. तसेच, शिवसेनेला स्थापनेपासून साथ देणाऱ्या सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या पदरी मृत्यू, हीच का उपकाराची परतफेड? असा सवालही राणेंनी मुख्यमंत्र्यांना केला.
दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मा. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 17, 2021
सिंधुदुर्ग-रत्नागिरीने शिवसेनेला स्थापनेपासून साथ केली, त्याबदल्यात शिवसेनेने कोरोना काळात सिंधुदुर्गात ९०१ तर रत्नागिरीमध्ये १५६१ मृत्यु दिले. याला संपूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. दोन्ही जिल्ह्यात डॉक्टर नाही, नर्स, वार्डबॉय, औषध पुरवठा व ऑक्सिजन नाही. एवढ्या वर्षाच्या निष्ठेनंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या पदरी मृत्यू. मुख्यमंत्री हीच का उपकाराची परतफेड?, असे राणेंनी ट्विटरवरुन म्हटलंय.
आरोग्य कर्मचारी पुरविण्याची सूचना
राणे म्हणाले, जिल्ह्याची आरोग्यव्यवस्था अत्यंत बिकट आहे. अनेक रुग्णांचे बळी जात आहेत, तर काहीजण अत्यवस्थ आहेत. याबाबत आपलं राज्याच्या आरोग्य सचिवांशी सकाळीच बोलणं झालं. त्यावेळी त्यांच्याशी मी विस्तृत चर्चा करून जिल्ह्यातील रुग्णालयांना फिजिशियन, डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी पुरविण्यासंदर्भात सूचना केल्या. त्यानुसार त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्वरित देण्याचे आश्वासन दिले आहे.