सावंतवाडी : आंबोली, गेळे येथील अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या कबुलायतदार गावकरप्रश्नी नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला असून तो शासनाने तत्त्वत: स्वीकारला आहे. तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा अहवाल आपल्या विभागाकडे दिला आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी मिळणार असून, लगेच अध्यादेशही निघेल, अशी माहिती राज्याचे गृह व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी शिवसेना-भाजप युती दोन दिवसांत निश्चित होईल, असेही स्पष्ट केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, अतुल बंगे उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, आंबोली, चौकुळ व गेळे येथील कबुलायतदार गावकर प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. तो सुटत नव्हता. पण तेथील ग्रामस्थांनी सहकार्य केले. त्यामुळे हा प्रश्न सुटण्यास मदत झाली. पहिल्या टप्प्यात आंबोली व गेळे येथील ग्रामस्थांनी प्रश्न सुटावा म्हणून पाठपुरावा केला. त्यानंतर याबाबत मंत्रालयात बैठक झाली.
या बैठकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिसदस्य समिती नेमण्यात आली. या समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली व अहवाल तयार केला होता.