कणकवली - लोकांना समाधानकारक सेवा देणे हिच लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. कार्यकर्त्यांनी दर्जेदार विकास कामे उभी केल्याने या भागाचा खर्या अर्थाने विकास करता आला. माझ्या नावलौकिकात आनंद ठाकूर सारख्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. येत्या काळात रोजगार देणार्या उपक्रमांवर भर देताना नागरीकांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठीचे प्रयत्न व्हायला हवेत असे प्रतिपादन सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी केले.हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीचे आय.एस.ओ. मानांकन वितरण व नुतन सभागृह उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत बोलत होते. पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम, जिल्हापरीषद सदस्या राजलक्ष्मी डिचवलकर, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर, सरपंच आनंद ठाकूर, पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, सुभाष सावंत, दिव्या पेडणेकर, उपसरपंच दिनकर उर्फ़ राजू पेडणेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, माजी उपसभापती बाबा वर्देकर, बुलंद पटेल, नवनिर्वाचित सरपंच गौसीया पटेल, माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र डिचवलकर, सोसायटीचे चेअरमन डॉ. अनिल ठाकूर, करंजे सरपंच मंगेश तळगांवकर, विस्तार अधिकारी अरूण चव्हाण, सूर्यकांत वारंग, रमेश पावसकर, राजेश पावसकर, मोहन सोहनी आदी उपस्थित होते. मावळते सरपंच आनंद ठाकुर व सहकारी सदस्य, सेवानिवृत्त नळकामगार रामचंद्र कदम, नूतन सरपंच व सदस्य, ग्रामविकास अधिकारी दिपक तेंडुलकर, वामन मेस्त्री तसेच गावातील कन्यारत्न प्राप्त मातांचा ठेव प्रमाणपत्र देत सत्कार करण्यात आला.यावेळी सतिश सावंत म्हणाले, लोकप्रतिनिधींकडून होणार्या कामांचे सोशल ऑडीट नागरीक करत असतात. कार्यकर्त्यांमध्ये विकासाविषयी तळमळ असल्यास मोठे काम उभे राहते . त्याचे मुर्तीमंत उदाहरण हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायत आहे. आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याने नागरीकांना दर्जेदार सेवा देणे ही जबाबदारी आहे. येत्या काळात ही जबाबदारी पार पाडताना गावाच्या कानाकोपर्यातून येणार्या नागरीकांना तत्पर सेवा मिळणे अपेक्षित आहे असे सांगितले.भाग्यलक्ष्मी साटम म्हणाल्या, महिलांनी विकासप्रक्रियेत पुढाकाराने सहभागी व्हायला हवे. नागरीकांच्या सहभागातून विकासाला खर्या अर्थाने गती मिळत असते .त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. सुनील रेडकर म्हणाले, सुसज्ज सभागृहातून विकासात्मक विचारांची देवाणघेवाण करताना गावच्या विकासासाठी नाविण्यपूर्ण योजना राबविल्यास भव्य इमारत उभारण्यापाठीमागील उद्देश साध्य होणार आहे, रमेश पावसकर, बुलंद पटेल, प्रा. भरमू नौकुडकर, डॉ. अनिल ठाकूर, बाबासाहेब वर्देकर आदींनी मनोगत व्यक्त करताना आनंद ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला. सूत्रसंचालन दिपक तेंडुलकर, प्रास्ताविक सरपंच आनंद ठाकूर तर आभार पोलीस पाटील संतोष तांबे यांनी मानले.
नागरिकांचे समाधान ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी - सतीश सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 6:41 PM