रस्ता नूतनीकरण कामाच्या मुद्यावरून खडाजँगी ! कणकवली नगरपंचायत सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 07:19 PM2019-12-30T19:19:31+5:302019-12-30T19:21:32+5:30
या सभेत नगरसेवक कन्हैया पारकर यांनी कणकवली शहरातील कामतसृष्टी ते रेल्वेस्थानक तसेच अन्य रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून अंदाजपत्रकप्रमाणे होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कणकवली : कणकवली शहरातील कामतसृष्टी ते रेल्वेस्थानक रस्ता नूतनीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने केले जात आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे ते काम केले जात नसल्याचा आरोप नगरसेवक कन्हैया पारकर , रुपेश नार्वेकर यांनी केला. तसेच संबधित काम थांबविण्याची मागणी केली. तर काम थांबविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अशी विचारणा करीत सत्ताधारी गटाचे नगरसेवक अभिजित मुसळे, संजय कामतेकर , बंडू हर्णे हे आक्रमक झाले. त्यामुळे या विषयावरील आरोप -प्रत्यारोपांमुळे नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत दोन्ही गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजँगी उडाली.
दरम्यान, निकृष्ठ दर्जाचे काम होत असेल तर चौकशी करून मुख्याधिकारी संबधित ठेकेदारावर कारवाई करतील. तसेच तुमच्या विरोधात संबधित ठेकेदाराने केलेल्या तक्रारीची पण चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल. असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी सांगत या वादाच्या मुद्यावर पडदा टाकला. त्यामुळे दोन्ही गटाचे नगरसेवक काही काळासाठी शांत झाले.
कणकवली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा सोमवारी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, मुख्याधिकारी अतुल पिंपळे उपस्थित होते.
या सभेत नगरसेवक कन्हैया पारकर यांनी कणकवली शहरातील कामतसृष्टी ते रेल्वेस्थानक तसेच अन्य रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून अंदाजपत्रकप्रमाणे होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी त्याबाबत काय कारवाई केली? असे विचारले. त्याला सत्ताधारी गटाचे नगरसेवक अभिजित मुसळे, संजय कामतेकर यांनी आक्षेप घेतला. त्यावरून जोरदार वाद झाला.
शहरात चुकीच्या पद्धतीने रस्त्यांची कामे होत आहेत. त्यामुळे नगराध्यक्षानी त्याकडे लक्ष द्यावा. असे रुपेश नार्वेकर यावेळी म्हणाले. त्यावर आमचे सर्व कामांवर लक्ष असून तुम्ही काही काळजी करू नका . असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.
त्यानंतर विरोधी नगरसेवक व सत्ताधारी नगरसेवक यांच्याकडून एकमेकांवर विविध आरोप करण्यात आले. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. तर बंडू हर्णे यांनी विरोधी नगरसेवकांच्या मुद्यावर केलेल्या कोटीमुळे सभागृहात जोरदार हशा देखील पिकला.
त्यावेळी मुख्याधिकारी पिंपळे यांनी कामतसृष्टी ते रेल्वेस्थानक या रस्त्याच्या कामाचा अहवाल करून देण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या. तसेच रस्ता दर्जा तपासणीचे अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत . त्यांना या कामाची तपासणी करण्याबाबत कळविले असल्याचे स्पष्ट केले . दर्जा तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील प्रशासकीय कार्यवाही करू . तसेच तुमच्याविरोधात ठेकेदाराने तक्रार केली असून त्याबाबत तुम्ही खुलासा द्यावा . असेही पारकर व नार्वेकर यांना त्यांनी सांगितले. त्यानंतर नगराध्यक्षानी या विषयात हस्तक्षेप केल्याने सभागृहातील वातावरण शांत झाले.
कणकवली शहर विकास आराखडयास १५ डिसेंबर रोजी २० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सुधारित शहर विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी तसा इरादा जाहीर करून वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.तर १० जानेवारी २०२० पूर्वी संबधित काम करण्यासाठी एजन्सी नेमू.असे मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
खरेदीखताने मालमत्ता फेरफार करताना विलंब शुल्क खरेदी खत झाल्यापासून ९० दिवसांनंतर खरेदीखतामधील किमतीच्या ०.५० टक्के घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
शहरातील रामेश्वर प्लाझा जवळ ओहोळावर कोणी अतिक्रमण केले असेल तर बांधकामाची मोजणी तसेच पाहणी करा. त्याचबरोबर अतिक्रमण करण्यात आले असेल तर कारवाई करा. असे आदेश मुख्याधिकारी पिंपळे यांनी अभियंता व कर्मचाऱ्यांना दिले.
मराठामंडळ जवळ इमारतीचे बांधकाम सुरू असून तेथील ओहोळ बंद करण्यात येणार आहे. तसे झाले तर पावसाळ्यात शहरातील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे संबधित इमारतीच्या विकासकाशी याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी चर्चा करून समस्या सोडवावी . असे यावेळी नगराध्यक्षानी सांगितले. त्याला अनुमती देत मुख्याधिकाऱ्यांनी बैठक लावण्याचे निश्चित केले.
सक्शन मशीन, विजेच्या खांबांवर क्रमांक घालणे, शहरातील ड्रेनेज सिस्टीम , शहरात लावले जाणारे फलक, एलईडी स्क्रीन यांच्यावर कर आकारणे, मुख्य चौकातील महामार्गावरील विक्रेत्यांचे छत्र्या लावून करण्यात आलेले अतिक्रमण , नगरपंचायत मार्फत आकारण्यात येणाऱ्या फी व शुल्क वाढ आदी मुद्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.
कणकवली नगरपंचायत सर्वसाधारण सभेत नगरसेवक आक्रमक झाले होते.