कणकवली : संदेश पारकर हे पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले त्या विजयामध्ये समीर नलावडे यांचे मोठे योगदान आहे. त्यानंतर पारकर आतापर्यंत केव्हाच नगराध्यक्ष होऊ शकले नाहीत. तर कणकवलीची सत्ता पण मिळवू शकलेले नाहीत. ही वस्तुस्थिती रुपेश नार्वेकर यांना माहीत असूनही ते आंधळ्याचे सोंग घेत आहेत . ते त्यांनी आधी बंद करावे आणि मगच टीका करावी. असा टोला नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली शहराच्या राजकारणात संदेश पारकर यांच्या पाठीशी समीर नलावडे होते म्हणूनच त्यांचे नाव जिल्ह्याभरात त्यावेळी मोठे झाले. पण जेव्हा नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पारकर यांची साथ सोडली त्यानंतर पारकर यांनी आपली राजकीय कारकीर्द मागे वळून पाहिली तर त्यांना भ्रमाचा भोपळा फुटल्याचे दिसेल. पारकर यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्या मदतीला धावून आलेले नगरसेवक रुपेश नार्वेकर हे पारकरांच्या उजाड झालेल्या शेतातले शेवटचे बुजगावणे आहेत.नार्वेकर यांनी आपला वापर करून घेणाऱ्या पारकरांबद्दल कितीवेळा गळा काढला असेल याचा आधी विचार करावा. समीर नलावडे यांच्या रत्नागिरी , पाली दौऱ्याशी जोडला जात असलेला संबंध हा पारकर यांचा दिशाभूल करण्याच्या राजकारणाचा एक भाग आहे.
खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्याशी निष्ठेने राहिल्यामुळेच समीर नलावडे यांना कणकवली नगरीचे नगराध्यक्ष पद मिळाले. मात्र राजकारणाच्या अधोगतीकडे चाललेल्या नार्वेकर यांच्या नेत्याकडून आतापर्यंत कणकवलीत अशीच दिशाभूल राजकारण करण्याची परंपरा सुरू आहे. ती नार्वेकर यांच्या रूपाने पुढे चालवली जात आहे. पारकर यांच्यामुळे नलावडेना आतापर्यंत पदे मिळाली हे नार्वेकर यांचे म्हणणे कितपत सत्य आहे ? ती मागच्या १५ वर्षाच्या निवडणूक आठवून पाहिल्या तर लक्षात येईल.नार्वेकर यांच्या नेत्याची कणकवलीत एवढीच ताकद होती तर ते स्वतः उभे राहूनही निवडणुकीला पराभूत झाले कसे ? आमदार नितेश राणे यांनी कणकवलीच्या विकासाचे व्हिजन घेत निवडणुकीत मते मागितली. मात्र , पारकरांची निवडणूक लढवणे ही भूमिका कशासाठी असते ते कणकवलीकरांसोबत आता सर्वच राजकीय पक्षांनाही माहिती झाले आहे. संदेश पारकर यांनी नारायण राणेंवर टीका करताना आपली क्षमता नाही हे ओळखले नाही. त्यामुळेच त्यांना ती आठवण करून देण्यासाठी नलावडे यांना उत्तर द्यावे लागले.ब्लॅकमेलिंग करणे हा रुपेश नार्वेकर यांच्या नेत्यांचा पूर्वांपार चालत आलेला धंदा आहे. नलावडे यांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळच आलेली नाही किंवा येणार नाही. मात्र नार्वेकर यांच्या नेत्यांना मात्र दुसऱ्या पक्षातून विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. असेही या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.