रेडीऐवजी संकेश्वर बांदा मार्गाला मंजुरी, एनएच ४८ म्हणून ओळखला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 10:40 PM2020-09-25T22:40:01+5:302020-09-25T22:40:06+5:30
या महामार्गाचा नंबर एनएच ४८ ही निश्चित करण्यात आला असून, तो बांदा येथे एनएच ६६ ला जोडला जाणार आहे.
अनंत जाधव
सावंतवाडी : महाराष्ट्र व कर्नाटकला जोडणा-या नव्या रेडी संकेश्वर मार्गाऐवजी केंद्राने संकेश्वर-बांदा मार्गाला मंजुरी दिली असून, त्याबाबतचे नोटिफिकेशन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून काढण्यात आले आहे. त्यामुळे हा तब्बल १०३ किलोमीटरचा मार्ग असणार आहे. हा रस्ता कर्नाटकातून संकेश्वरवरून सुरू होणार असून, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज-आजारा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली-माडखोल-सावंतवाडी-इन्सुली वरून तो महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या बांद्याला जोडला जाणार आहे. या महामार्गाचा नंबर एनएच ४८ ही निश्चित करण्यात आला असून, तो बांदा येथे एनएच ६६ ला जोडला जाणार आहे.
महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला जोडणा-या नव्या महामार्गाची संकल्पना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली होती. त्यानंतर रेडीपासून संकेश्वरपर्यंतच्या रस्त्याचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. मात्र नव्या सर्वेक्षणात हा रस्ता संंकेश्वरवरून रेडीला जोडण्याऐवजी बांद्याला जोडण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कारण कर्नाटकमधील संंकेश्वर येथे सर्कल करून ते महाराष्ट्राचे शेवटचे टोक म्हणून ओळखले जाते, अशा बांद्याला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन मार्ग संकेश्वर ते बांदा असा करण्यात आला आहे. १०३ किलोमीटरचा हा महामार्ग असणार आहे.
कर्नाटकमधील संंकेश्वर येथून हा मार्ग सुरू होणार असून, तो कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज-आजरा असा असणार आहे. तर नंतर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली-माडखोल-सावंतवाडीनंतर इन्सुलीला जोडला जाईल तर पुढे मुख्य महामार्ग एनएच ६६ ला या रस्त्याची समाप्ती होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील दोन जिल्हे तर कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातून हा रस्ता जाणार आहे. हा रस्ता चौपदरीकरण होणार असून, त्यासाठी लागणारी जमिनीचे अधिग्रहण करण्याचे काम सुरू झाले असून, ते आता जवळजवळ पूर्ण होतही आले आहे.
त्यामुळे हा महामार्ग होणार हे निश्चित झाले आहे. त्यानंतर याबाबतचे नोटिफिकेशन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने जारी केले आहे. त्यामुळे आता हा रस्ता महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या बांधकाम विभागाकडून केंद्राकडे वर्ग करावा लागणार आहे. सुरुवातीला या रस्त्याबाबत अनेक शंका होत्या. मात्र आता हा रस्ता आंबोली घाटातूनच जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. याबाबतच्या परवानग्या केंद्र स्तरावरील असल्याने त्या संबंधित ठेकेदार घेईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र या रस्त्याचे काम आता लवकरात लवकर सुरू होणार हे निश्चित झाले आहे.