वाळू लिलाव झाले... कब्जा केव्हा
By admin | Published: January 11, 2016 11:30 PM2016-01-11T23:30:36+5:302016-01-12T00:34:28+5:30
ठेकेदारांचा सवाल : कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक रकमेचे व्याज शासन देणार का?
अजित चंपूणावर --- बुबनाळ -शिरोळ तालुक्यात वाळू प्लॉटच्या लिलावानंतर ठेकेदारांना कब्जापट्टी न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. शासनाने काढलेल्या लिलावात भाग घेऊन वाळूसाठे घ्यायचे, त्यात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करायची, अशी परिस्थिती असताना वाळू उपसा करण्यासाठी रीतसर परवाना मिळत नसल्याने ठेकेदारांची गोची झाली आहे.
दरम्यान, तालुक्यातील गौरवाडचा एक प्लॉट वगळता उर्वरित सर्व साठ्यांची ठेकेदारांनी संपूर्ण रक्कम भरली आहे. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे वाळू उपसा करता येत नसल्यामुळे वाळू व्यावसायिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे महसूल विभागाच्या भूमिकेविषयी साशंकता व्यक्त होत आहे.
यंदा पावसाअभावी महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत वाळू गटाचे लिलाव होणार की नाही याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र, शिरोळ तालुक्यात २४ नोव्हेंबर २०१५ ला ई-टेंडर पद्धतीने वाळूसाठ्यांचे लिलाव झाले. लिलावाची संपूर्ण रक्कम ठेकेदारांनी १४ ते १७ डिसेंबर २०१५ अखेर भरली असल्याचे समजते. त्यामुळे लिलावाची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर संबंधित विभागाकडून सात दिवसांच्या आत वाळू गटाची कब्जापट्टी व रॉयल्टी पावती पुस्तक देणे बंधनकारक आहे.
एकीकडे वाळू ठेकेदारांनी काही कोटी रुपये गुंतवणूक करून लिलाव घेऊन दीड महिन्याचा काळ लोटला आहे. भरलेल्या पैशाला व्याज शासन देणार का? असा सवाल ठेकेदारांतून उपस्थित होत आहे. वाळू व्यवसायावर वाहतूकदार, बांधकाम व्यावसायिक, मजूर अनेक घटकांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे तत्काळ कब्जापट्टी द्यावी, अशी मागणी होत आहे.
वरिष्ठांकडून आदेश नाही : पुजारी
वाळूच्या प्लॉटचे लिलाव झाले असले तरी वरिष्ठांकडून आदेश मिळाल्यानंतर पंचनामा करून लिलाव गट नंबरचा ताबा देण्यात येणार आहे. मात्र, अजूनही वरिष्ठ कार्यालयाकडून याबाबत आदेश मिळाले नसल्याचे नृसिंहवाडी मंडल अधिकारी ए. डी. पुजारी यांनी सांगितले.