ओरोस: राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाने दि. १ व २ फेब्रुवारी रोजी नाटे (राजापूर) येथे आयोजित केलेल्या सहाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून माध्यमकर्मी व घुंगुरकाठी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांना निमंत्रित करण्यात आले आहे.यशवंतगडाच्या पायथ्याशी वसलेल्या या निसर्गरम्य गावात होणाऱ्या या साहित्य मेळ्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरणचे लेखक गंगाराम गवाणकर यांची निवड यापुर्वीच जाहीर झाली आहे.१९५३ साली स्थापन झालेला राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई व नाटे ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे हे साहित्य संमेलन आयोजित केले आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अघ्यक्ष सुभाष लाड, उपाध्यक्ष तुकाराम चव्हाण, अशोक कांबळे, सरचिटणीस स्नेहल आयरे, विजय हटकर, नाटेच्या सरपंच योगिता बांदकर आदि प्रयत्नशील आहेत.
संमेलनात सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर (साहित्यातील साचलेपणाची कोंडी फुटु दे), प्रा. डॉ. राहुल मराठे (ग्रामीण साहित्य संमेलनांची गरज), वृंदा कांबळी (कथाकथन: तंत्र आणि मंत्र), रविराज पराडकर (शिवछत्रपती आणि तळकोकण) सहभागी होणार आहेत. प्रा. डॉ. अलका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. संमेलनस्थळाला दत्ताराम केशव पावसकर साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे.दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, कविसंमेलन, विविध प्रदर्शने, व्याख्याने, लोककलादर्शन, पारितोषिक वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. संमेलनाचे उद्घाटन १ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. संमेलनाला रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोकणातील साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.