सावंतवाडी - ''आम्ही लोकशाही मानणारे आहोत. त्यामुळे कितीही धमक्या दिल्या तरी घाबरणार नाही'', असे सांगत काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी डॉ. जयेंद्र परूळेकर हे नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. नगरसेवकपद काँग्रेसने दिले आहे, कुणी आपल्या घरातून दिले नाही, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी महिला जिल्हाध्यक्षा नीता राणे, माजी आमदार विजय सावंत, प्रदेश प्रतिनिधी बाळा गावडे, डॉ. जयेंद्र परूळेकर, ईशाद शेख, साईनाथ चव्हाण, राजू मसूरकर, प्रेमानंद देसाई, अर्जुन ठोमके, विभावरी सुकी, आबा मुंज आदी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, मध्यंतरीच्या काळात ब-याच घडामोडी घडल्या आहेत. पण काँग्रेसवर प्रेम करणारा कार्यकर्ता जरासुद्ध मागे हटला नाही. हळुहळु काँग्रेस वाढत असून अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्या सर्वांचा सन्मान केला जाईल. कार्यकर्त्यांना काँग्रेसच्यावतीने पाठिशी राहण्याचे आश्वासन दिले असून, सर्व कार्यकर्ते आता संघटित होऊ लागले असल्याचेही यावेळी सावंत यांनी सांगितले.
परूळेकर यांना नगरसेवक पदाचा राजीनामा द्या, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सांगितले आहे. मात्र, हे पद काँग्रेसचे आहे. कोणी घरातून दिले नाही. तसेच आता आम्ही पक्षाकडून आलेल्या उमेदवा-या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत असतो. त्यावेळी ते नेते असे करीत होते. त्यामुळे आपल्यामुळे नगरसेवकपद मिळाले असे म्हणणे चुकीचे आहे, असे सावंत यांनी सांगितले. तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसला गरज असेल त्यावेळी त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी कोणी राजीनामा देण्यासाठी धमकी देत असेल तर त्याला आम्ही घाबरणारे नाही. काँग्रेस पक्ष लोकशाही मानणारा आहे, असे यावेळी सावंत यांनी सांगितले. आम्ही पोलीस संरक्षणाची मागणी केली नाही तसेच न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. जर कोण काँग्रेस पक्षात येत असतील तर त्यांनी बिनधास्त यावे. आम्ही कोणाला व्यक्तिगत विरोध केला नाही आणि करणारही नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार नीतेश राणे अद्याप तरी पक्षात असल्याचे विकास सावंत यांनी स्पष्ट केले.
तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही : चव्हाणडॉ. परूळेकर जर तुमच्या केसालाही धक्का लागला तरी काँग्रेस पक्ष गप्प बसणार नाही. त्यामुळे काम करा, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत जाहीर मेळाव्यात तसेच व्यक्तीगत भेटीत सांगितल्याचे डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी सांगितले. तसेच काँग्रेस पक्षाने आदेश दिला तरच राजीनाम देऊ, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.