कणकवली : महामार्गावर ओसरगाव येथे दोघा दुचाकीस्वारांनी एका ज्येष्ठ नागरिकाकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे. शंकर मालोजी राणे (६७, रा. ओसरगाव) असे त्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी दोघा संशयित दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबईहून गणेशोत्सवासाठी शंकर राणे हे गावी आले आहेत. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ओसरगाव महिला भवन येथील जिल्हा बँकेच्या शाखेत ते गेले होते. तेथे पैसे काढून पुन्हा चालत महामार्गाने घरी येत होते. पटेलवाडी येथे दुपारी पोस्टाजवळून पायी जात असताना रेनकोट घातलेला एक दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आला. आपण पोलीस असल्याची बतावणी त्याने केली. रात्री दोन लाखाची तस्करी झाली असून आमची गस्त सुरू आहे. तुम्ही रस्त्यावर कुठे फिरता? असे त्याने विचारले.राणे यांना तो खरोखरच पोलीस असल्यासारखे वाटले. त्यामुळे त्यांनी त्याला मुंबईहून येथे गणपतीसाठी आलो असे सांगितले. त्याचवेळी रस्त्याच्या पलीकडून पांढऱ्या रंगाचे मळकट टी-शर्ट घातलेला एक तरुण जात होता.यावेळी राणे यांच्यासमोर असलेल्या दुचाकीस्वाराने त्याला शिवी घालून बोलविले. त्याने तुम्ही पोलीस कसे, आयकार्ड दाखवा असे सांगितले. यावेळी त्या व्यक्तीला त्याने ओळखपत्र दाखविले.
राणे यांना ओळखपत्र बघणार का? असे विचारले. त्यांनी घाबरून नको म्हणून सांगितले. त्यावेळी त्या दुचाकीस्वाराने दुसऱ्या व्यक्तीकडे रुमाल मागितला. तसेच राणेंकडेही रुमाल मागितला. त्या रूमालात दोन अंगठ्या, सोन्याची चेन, मनगटी घड्याळ, पैशाचे पाकीट, डायरी ठेवण्यास सांगितले. तसेच रुमाल गुंडाळून राणेंकडे परत दिला.दुसऱ्या व्यक्तीला दुचाकीवरून पोलीस स्टेशनला घेऊन जातो असे सांगून ते निघून गेले. शंकर राणे हे तेथून रिक्षा स्टॅण्डवर येऊन तेथील रिक्षात बसले व आपल्याकडील गुंडाळलेला रूमाल पाहिला तर त्यांना त्यात काहीच सापडले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.संशयितानी राणे यांच्याकडील ४५ हजारांची सोन्याची चेन, २८ हजारांची अंगठी तसेच १४ हजार रुपयांची अंगठी आणि रोख ४० हजार रुपये लुटल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात दोघा अज्ञात संशयितांविरोधी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.विवाहितेचा मृतदेह सापडला हरकुळ खुर्द हुलेवाडी येथील विवाहिता अर्चना अर्जुन हुले (४५) हिचा मृतदेह उगवाई नदीच्या पात्रात सोमवारी सकाळी आढळून आला. तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, त्यामागचे कारण समजू शकले नाही.
हरकुळ खुर्द-हुलेवाडी येथील अर्चना हुले ही विवाहिता रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली होती. पण सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी परतली नव्हती. त्यामुळे तिचे कुटुंबीय तिला शोधत असताना तिच्यासोबत असलेली छत्री व चप्पल उगवाई नदीच्या पुलावर दिसून आले. त्यामुळे शंका आल्याने नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत तिचा शोध घेण्यात आला. मात्र ती आढळून आली नाही.सोमवारी सकाळी पुन्हा शोध घेतला असता तिचा उगवाई नदीच्या पात्रात सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झाडीझुडपात मृतदेह सापडला. याबाबत अर्चना हिचे दीर उत्तम मनोहर हुले यांनी कणकवली पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यांनतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.