मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे परतीच्या पावसाने विजांच्या जोरदार कडकडाटात गुरुवारी सायंकाळी पुन्हा हजेरी लावली. यावेळी सायंकाळी मालवण दांडी भागात कोसळलेल्या विजेमुळे दांडेश्वर मंदिराच्या मागे राहणाऱ्या नारायण मोंडकर यांच्या जागेतील दोन माड जळाले आहेत.
या आगीची ठिणगी मोंडकर यांच्या झावळाच्या झोपडीवर पडल्याने झोपडीला आग लागून अंशत: नुकसान झाले. यावेळी ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करत तसेच पालिकेच्या अग्निशमन बंबाच्या साहाय्याने ही आग विझविण्यात आली.दिवाळीपूर्वी मालवणला झोडपून काढणाऱ्या पावसाने दिवाळी कालावधीत विश्रांती घेतली होती. मात्र गुरुवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन ढगांचा गडगडाट सुरु झाला. यानंतर पावसाने हजेरी लावली.
यावेळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या विजांच्या जोरदार कडकडाटात दांडी भागातील दांडेश्वर मंदीराच्या मागे विजेचा लोळ कोसळला. यामध्ये नारायण मोंडकर यांच्या जागेतील दोन माड जळून नुकसान झाले.माडांना लागलेल्या आगीची ठिणगी मोंडकर यांच्या झोपडीवर पडल्याने झोपडीला आग लागली. मात्र ग्रामस्थांनी तातडीने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. यावेळी दाखल झालेल्या पालिकेच्या अग्निशमन बंबाने पाण्याचा मारा करत आग पूर्णत: विझविण्यात आली. त्यामुळे झोपडीचे नुकसान झाले.
सायंकाळनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री मालवणात जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसांमुळे नागरिकांसह पर्यटकांची तारांबळ उडाली. बत्तीही गुल झाली होती.