कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथील भारत पेट्रोलपंप येथे आयोजित केलेल्या कमी दरात पेट्रोल विक्रीवरून शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामुळे येथील वातावरण काही काळ तंग झाले होते. या घटनेनंतर कुडाळ शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या घटनेनंतर आमदार नाईक यांच्यासह शिवसेना व भाजपच्या सुमारे ४० पदाधिकारी कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कुडाळ पोलीस निरीक्षक व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आमदार नाईक व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, तो आरोप पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी फेटाळून लावला आहे.
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथील भारत पेट्रोलपंप येथे शनिवारी १०० रुपयांत दोन लीटर पेट्रोल प्रतिवाहन तसेच नागरिकांनी जर भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखविले, तर एक लीटर मोफत पेट्रोल मिळणार असल्याचे जाहीर केलं होतं. यावेळी भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची व खडाजंगी झाली. दोन्हीही बाजूने एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली व वातावरण तापले.
हे तर पूर्वनियोजित षड्यंत्र : रणजित देसाई
शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भाजपच्या कार्यकर्त्यांना मोफत पेट्रोल देण्याच्या जाहिराती आमदार नाईक यांच्याकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना चिथावणी द्यायची आणि कुडाळ शहरात राडा घडविण्याच्या दृष्टीने नाईक यांनी हे षड्यंत्र रचले होते, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई यांनी दिली.