सिंधुदुर्ग: नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून हा विरोध कायम राहणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यादरम्यान म्हटलं होतं. मात्र यानंतर लगेचच काही शिवसैनिक प्रकल्पाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. या प्रकरणाची पक्षानं गंभीर दखल घेतली आहे. शिवसेना विभागप्रमुख राजा काजवे यांच्या उचलबांगडीनंतर आता जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
नाणार प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी १७ फेब्रुवारी शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यात विभागप्रमुख राजा काजवे, जी.प.सदस्या मंदा शिवलकर यांच्यासह शिवसेनेचे इतरही पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांनतर राजा काजवे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. तर आता शिवलकर यांना सुद्धा पक्षातून काढण्यात आले आहे.
शिवसेनेकडून रत्नागिरी येथे नाणार प्रकल्पाच्या विरोधकांचा निर्धार मेळावा घेण्यात आला, त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होणार नाही अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली. मात्र याचवेळी नाणारला समर्थन करणाऱ्या मंदा शिवलकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची घोषणा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेत केली. उद्धव ठाकरेंच्या अदेशानुसार हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले.
तसेच इतर शिवसैनिकांना सुद्धा शेवटची संधी दिली जात असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर उद्या होणाऱ्या नाणार प्रकल्पाच्या समर्थन मेळाव्यात जर कुणी शिवसैनिक आढळून आला तर त्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.