रत्नागिरी : सुरक्षिततेच्या मुख्य मुद्द्यावर जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प होण्यास शिवसेनेचा प्रखर विरोध आहे. प्रकल्पाचे ठिकाण किनारपट्टीवर असून, दहशतवाद्यांपासूनही संभाव्य धोका आहे. हे क्षेत्र भूकंपप्रवण आहे. त्यामुळे धोका अधिकच वाढला आहे. त्सुनामीचाही धोका नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर येथे हा प्रकल्प उभारायला देऊन जैतापूरचे फुकुशिमा होऊ दिले जाणार नाही, अशी शिवसेनेची स्पष्ट भूमिका असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पत्रकार परिषदेत दिली. अन्य देश अणुऊर्जा प्रकल्प गुंडाळले असताना आपल्याकडे असे प्रकल्प उभारले जात आहेत. त्याला सेनेचा विरोध असल्याचे ते म्हणाले. पत्रकारपरिषदेपूर्वी सावरकर नाट्यगृहात जनकल्याण पर्व मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश प्रवक्ते बाळ माने, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक व सचिन कदम, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, विनय नातूू, सेनेच्या जिल्हा महिला आघाडीप्रमुख शिल्पा सुर्वे, अॅड. बाबा परुळेकर, अॅड. विलास पाटणे, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी, उपनगराध्यक्ष संजय साळवी, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, संजय पुनसकर उपस्थित होते.मोदी सरकारने वर्षभरात पूर्ण केलेल्या कामांबाबत मेळाव्यात गीते यांनी माहिती दिली. मोदी सरकारच्याआधीची दहा वर्षे घोटाळ्याची म्हणून नोंदली गेली. पण, गेल्या वर्षात मोदी सरकारमध्ये एकही घोटाळा झाला नाही.मोदी सरकारने देशात स्वच्छता मोहीम राबवली. सर्वसामान्यांसाठी तीन प्रकारच्या विमा योजना सुुरू केल्या. त्यामुळे गेल्या महिनाभरात देशात विमा सुरक्षेखाली ६ कोटी नवीन खाती उघडली गेली आहेत. सामाजिक सुरक्षा देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. देशातील सर्व बंदरे रेल्वेला जोडली जाणार आहेत. कोकणातील रायगडचे दिघी व रत्नागिरीतील जयगड बंदर रेल्वेने जोडण्याचा निर्णय झाला असून, कार्यवाही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)साळवींचा भाजपला घरचा आहेरवर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसाठी अनेक निर्णय घेतले. मात्र, कोकणच्या भवितव्याचा विचार केला नाही. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. भविष्यात जैतापूर प्रकल्पामुळे कोकणाचा होऊ शकणारा विनाश लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करणे आवश्यक आहे. हा विनाशकारी प्रकल्प करण्याची घोषणा केली जात असताना कोकणात अच्छे दिन कसे काय असू शकतात, असा घरचा आहेर शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी भाजपला जनकल्याण मेळाव्यात बोलताना दिला.उद्योगांना सुविधा निर्माण करून देतानाच रायगड, रत्नागिरी व सिंधुुदुर्ग या तीन जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प उभारले जाणार आहेत. रत्नागिरीत आणखी एक प्रकल्प उभारण्यात येईल. तसेच रेल्वेचा एकतरी कारखाना कोकणात आणावा, अशी मागणी आपण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.
शिवसेना जैतापूरचे फुकुशिमा होऊ देणार नाही..
By admin | Published: May 28, 2015 12:51 AM