श्रीधर नाईक यांचे विचार आजही प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 06:00 PM2021-06-22T18:00:20+5:302021-06-22T18:57:51+5:30
Kankavli Sindhudurg : श्रीधर नाईक यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यामुळे ते विचार आत्मसात करतानाच त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा युवा पिढीने पुढे नेत समाजातील विकृती नष्ट करावी. तसे झाले तर श्रीधर नाईक यांना तीच खरी आदरांजली ठरेल. असे मत श्रीधर नाईक स्मृती दिन कार्यक्रमात श्रध्दांजली व्यक्त करताना मान्यवरांनी व्यक्त केले.
कणकवली : श्रीधर नाईक यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यामुळे ते विचार आत्मसात करतानाच त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा युवा पिढीने पुढे नेत समाजातील विकृती नष्ट करावी. तसे झाले तर श्रीधर नाईक यांना तीच खरी आदरांजली ठरेल. असे मत श्रीधर नाईक स्मृती दिन कार्यक्रमात श्रध्दांजली व्यक्त करताना मान्यवरांनी व्यक्त केले.
येथील नरडवे नाका येथे श्रीधर नाईक यांच्या नूतन पुतळ्याचे अनावरण मंगळवारी करण्यात आले. यावेळी श्रीधर नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत , खासदार विनायक राऊत, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, गौरीशंकर खोत, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर,संजय पडते, काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, काका कुडाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत,विकास कुडाळकर, बाळा भिसे, अतुल रावराणे, कन्हैया पारकर, अबीद नाईक,नगरसेवक सुशांत नाईक, संकेत नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी उदय सामंत म्हणाले, २२ जून हा सिंधुदुर्गच्या राजकारणातला काळा दिवस आहे. या दिवशी श्रीधर नाईक यांची राजकीय हत्या झाली.राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करणारे ते नेते होते.दहशती विरोधात लढण्यासाठी कोणी अंगावर आला तर शिंगावर घेण्याचा पायंडा त्यांनी पाडला आहे. दहशतवादी प्रवृत्ती सिंधुदुर्गातून हद्दपार झाली पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकसंघ होऊन या प्रवृत्तीविरोधात लढले पाहिजे. श्रीधर नाईक यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकाव्या लागतील.
विनायक राऊत म्हणाले,काही समाजकंटकांनी श्रीधर नाईक यांची हत्त्या करून जिल्ह्यात दहशत माजविली. त्यामुळे जिल्ह्याचे नाव बदनाम झाले. मात्र,जिल्हयातील जनतेने या अपप्रवृत्ती विरोधात लढा देऊन जिल्ह्यातील दहशत हटविण्याचे काम केले. त्यामुळे जिल्ह्यात आता शांतता पसरली आहे. श्रीधर नाईक यांचे बलिदान व्यर्थ गेलेले नाही. त्यांच्या बलिदानातून अपप्रवृत्ती विरोधात लढण्यासाठी आमच्या सारखे अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते निर्माण झाले.त्यांचा समाजसेवेचा आदर्श घेऊन आपण काम करू तसेच अनाथांना आधार देण्यासाठी श्रीधर नाईक यांच्या नावाने एक ट्रस्ट सुरु करण्याचे आवाहन त्यांनी श्रीधर नाईक प्रेमींना केले.
वैभव नाईक म्हणाले, श्रीधर नाईक यांची हत्या आम्हा कुटुंबियांच्या मनाला चटका लावणारीच होती.त्यांचे विचार नवीन पिढीला आत्मसात व्हावेत यासाठी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम आम्ही राबवून त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत. यावेळी गौरीशंकर खोत, संदेश पारकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यापुढेही लढा सुरूच राहील !
दहशतवादा विरोधातील आम्ही लढत आलो आहोत. यापुढेही तो लढा सुरू राहील. श्रीधर नाईक यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता त्यांचे विचार सर्व दूर पोहचविण्यासाठी आपल्याला पक्षभेद विसरून एकसंघपणे प्रयत्न करावे लागतील. असे माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यावेळी म्हणाले.
कणकवली येथील श्रीधर नाईक स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.