सिंधुदुर्गनगरी : २०१७-१८ शैक्षणिक वर्षात एस. एल. देसाई विद्यालय, पाट प्रशालेने अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकाचे नाव माध्यमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त न ठरविता दुसऱ्याच शिक्षकाला अतिरिक्त ठरविले आहे. या मनमानी विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ १५ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत धरणे आंदोलन करणार आहे.संघाची ९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक पतसंस्था सभागृहात बैठक झाली. यावेळी अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, कार्यवाह पांडुरंग काळे, विजय मयेकर, माधव यादव, शिवराम सावंत, पांडुरंग तळणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पाट विद्यालयाचे अन्यायग्रस्त शिक्षक रमेश ठाकूर यांनी आपली कैफियत मांडली. त्यावेळी असा अन्याय सहन न करता याविरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ठाकूर यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय देण्याचा निर्णय यावेळी झाला.
पाट विद्यालयाने अतिरिक्त शिक्षक म्हणून दुसऱ्या शिक्षकाचे नाव कळविलेले असताना ठाकूर यांना अतिरिक्त ठरविण्याचा प्रताप माध्यमिक शिक्षण विभागाने केला आहे.