वेंगुर्ले : वेंगुर्ले-मोचेमाड समुद्रकिनारी आॅलिव्ह रिडले कासवांच्या ६१ पिल्लांना सोमवारी सकाळी वनरक्षक व येथील स्थानिकांच्या उपस्थितीत मोचेमाड समुद्रात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.वेंगुर्ले-मोचेमाड समुद्रकिनारी २७ जानेवारीला आॅलिव्ह रिडले कासवांची १०१ अंडी येथील कासवमित्र श्रीधर कोचरेकर यांनी वनरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षित केली होती. यापैकी ६१ पिल्ले आज सकाळच्या सुमारास अंड्यातून बाहेर आली.
यासंबंधी वनरक्षक एस. एस. कांबळे यांना कल्पना देताच त्यांनी मोचेमाड समुद्र किनारी दाखल होत पिल्लांची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पिल्लांना मोचेमाड समुद्रात सोडण्यात आले.यावेळी मोचेमाड उपसरपंच पांडुरंग कोचरेकर, रमाकांत कोचरेकर, राजाराम तांडेल, तेजस तांडेल, निलेश आरावंदेकर, राजन खवणेकर, लक्ष्मण कोचरेकर आदी उपस्थित होते. येथील समुद्रकिनारी दुर्मिळ आॅलिव्ह रिडले कासवांची १५ घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या महिन्यात आॅलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.