सिंधुदुर्ग : महामार्गाच्या चौपदरीकरणात १०० जणांचा अपघाती मृत्यु : उपरकर यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:14 PM2018-11-16T12:14:14+5:302018-11-16T12:18:12+5:30
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम होताना १६०० कोटी रुपयाचा निधी खर्च केला जात आहे. मात्र या कोटयावधी रुपयाच्या निधीत १ रुपयाचा फायदा स्थानिक बेरोजगार तरुणांना किंवा व्यापाऱ्यांना, क्रशरधारकांना झालेला नाही. आतापर्यंत महामार्गाच्या कामादरम्यान सिंधुदुर्गात १०० जणांचा अपघाती मृत्यु, ५०० जण जखमी तर अनेक गाडयांचे नुकसान झाले आहे. असा आरोप मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम होताना १६०० कोटी रुपयाचा निधी खर्च केला जात आहे. मात्र या कोटयावधी रुपयाच्या निधीत १ रुपयाचा फायदा स्थानिक बेरोजगार तरुणांना किंवा व्यापाऱ्यांना, क्रशरधारकांना झालेला नाही. आतापर्यंत महामार्गाच्या कामादरम्यान सिंधुदुर्गात १०० जणांचा अपघाती मृत्यु, ५०० जण जखमी तर अनेक गाडयांचे नुकसान झाले आहे. असा आरोप मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात ते बोलत होते.
परशुराम उपरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्गातील एकाही तरुणाला महामार्गाचे काम घेतलेल्या संबंधीत दोन्ही ठेकेदार कंपन्यानी नोकरीला ठेवलेले नाही. आपल्या प्लान्टवर सुरक्षा रक्षक, लिपिक, शिपाई व अन्य विविध पदांवर परप्रांतीय कामगारांना ठेवण्यात आले आहे. धान्यपुरवठा करणारा ठेकेदारही परप्रांतीयच निवडण्यात आला आहे. त्यामुळे या महामार्गाच्या विकासात स्थानिकांच्या हाती काहीच लागलेले नाही.
पर्यावरणाच्या मुद्यावर मंत्रालयात झालेल्या बैठकीत पर्यावरण प्रेमींनी महामार्ग चौपदरिकरण कामात बाधित होणारे वृक्ष स्थलांतरित करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. तो प्रस्ताव शासनाने विचारात घेतला नाही.
भविष्यात महामार्गावरील झाडे तोडण्यात आल्याने मोठया प्रमाणात कॉक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. त्याचा त्रास जिल्ह्यातील जनतेला सहन करावा लागणार आहे. ठेकेदार कंपनीने आपल्या यंत्र सामुग्री तसेच मालमत्तेचा विमा उतरविला आहे. मात्र या कामा दरम्यान अपघात झाल्यास संबधित व्यक्तिस मदत होण्याच्या दृष्टिने अद्याप विमा उतरविण्याचे सौजन्य दाखविलेले नाही.
चौपदरीकरणाच्या मुद्यावर दोन्ही सत्ताधारी पक्ष बोलताना दिसत नाही. विकास होताना प्रकल्पग्रस्तांची झालेली वाताहात विचारात घेतली पाहीजे. रस्त्याचा विकास करत असताना अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली आहेत. याचा विचार व्यायला हवा. जनतेची दिशाभुल करण्यापलीकडे सत्ताधारी काहीही काम करत नाहीत.
कणकवलीतील काही नगरसेवकांनी उप अभियंत्याना निवेदन देवुन लक्ष वेधले आहे. मात्र त्यांनी सत्ताधारी म्हणुन मंत्र्याकडे मागण्याकरुन जनतेला दिलासा देण्याची गरज होती.मात्र तसे झालेले नाही. असेही उपरकर यावेळी म्हणाले.
ठेकेदारच श्रीमंत होणार !
केंद्र आणि राज्य शासनाचे एकच धोरण दिसुन येत आहे. ते म्हणजे श्रीमंताला अधिक श्रीमंत करणे. त्यामुळे ठेकेदारच या महामार्गाच्या चौपदरिकरण कामामुळे श्रीमंत होणार आहे. असेही उपरकर यावेळी म्हणाले.
झाडाना जीवदान देणे आवश्यक !
महामार्गाच्या कामादरम्यान हजारो झाडे तोडण्यात आली. त्यापैकी काही झाडे स्थलांतरीत करुन त्या झाडांना जीवदान देण्याची गरज होती. मात्र तसे न करता संबंधीत ठेकेदाराने व शासनाने पर्यावरणाचा विचार बाजुला सारुन चौपदरीकरणाचे काम केले आहे. हे योग्य नव्हे.
शहरातील वटवृक्ष वाचविण्यासाठी आपण सर्व प्राधिकरणाना पत्र दिले आहे. तसेच आवाज फाऊंडेशन सारख्या सामाजिक संस्थाशीही बोललो आहे. त्यांनी वृक्ष वाचविण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. शासनाने आता पुढाकार घ्यावा,असेही उपरकर यावेळी म्हणाले.