बांदा : गेल्या चार दिवसांत डोंगरपाल गावात माकडतापाचे दोन बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. गुरुवारी सकाळपासून डोंगरपाल गावात आरोग्य विभागाने स्वतंत्र तपासणी कक्षाची स्थापना केली आहे. दिवसभरात गावातील ६0 रुग्णांची तपासणी करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकरी डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.
पंचायत समितीचे सभापती रवींद्र मडगावकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले यांनी डोंगरपाल येथे भेट देत स्थानिकांशी संवाद साधला. गावातील सार्वजनिक विहिरीचे पाणी दूषित आढळल्याने पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने विहिरीची साफसफाई करुन पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे आदेश सभापती मडगावकर यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहेत.डोेंगरपाल गावात गेल्या चार दिवसांत गुणाजी भिकाजी परब व काशिनाथ गोपाळ गवस यांचा माकडतापाने मृत्यू झाल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गावात १३ रुग्ण हे माकडताप बाधित आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा देखील अलर्ट झाली आहे. गावात तापाच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याने आरोग्य विभागाने गावातच तपासणी कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला आहे.या तपासणी कक्षाच्या माध्यमातून आठवड्यातील गुरुवारी, शनिवार व मंगळवार हे तीन दिवस रुग्णांची गावातच आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येणार आहे. सकाळी हा तपासणी कक्ष सुरु करण्यात आला. पहिल्याच दिवशी याठिकाणी ६० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील एक रुग्ण संशयित असल्याने त्याला अधिक उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.पहिल्या दिवशी तपासणी कक्षात वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, आरोग्य सहाय्यक एच. एच. खान, विजय आंबेरकर, बाबाजी तुळसकर, डी. एस. म्हापणकर, परिचारीका रुणाली भोगले, प्रेमा कदम यांनी रुग्णांची तपासणी केली.
डोंगरपाल येथे गुरुवारी दुपारी सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती रवींद्र मडगावकर, उपसभापती निकिता सावंत, गटविकास अधिकारी गजानन भोसले यांनी भेट देत स्थानिकांशी संवाद साधला. दरम्यान, गेल्या चार दिवसांत दोघांचा माकडतापाने मृत्यू झाल्यामुळे माकडतापाच्या साथीबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
डोंगरपाल गावात माकडतापबाधित रुग्ण सापडल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. माकडतापाच्या पार्श्वभूमीवर गावात डस्टिंग करुन दूषित गोचिडांपासून संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. माकडतापाचे संकट टाळण्यासाठी स्थानिकांनी कोणती काळजी घ्यावी याच्या सूचना देण्यात येत आहेत. गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने पाणी शुुध्दीकरणासाठी आरोग्य विभागाकडून घरोघरी मेडिक्लोरचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी पाणी शुध्द करुनच प्यावे- डॉ. जगदीश पाटील,वैद्यकीय अधिकारी, बांदा आरोग्यकेंद्र