सिंधुदुर्ग : बांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांचा उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:11 PM2018-04-05T18:11:23+5:302018-04-05T18:11:23+5:30
बांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांनी उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे ते अतोनात नुकसान करीत आहेत. या परिसरात तब्बल ३० रानटी गव्यांचा कळप आहे. या गव्यांचा बंदोबस्त वनखात्याने करावा, अन्यथा शेतीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्या बागायतीला कुंपण घालून द्यावे, अशी मागणी बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.
बांदा : बांदा-सटमटवाडी परिसरात गव्यांनी उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे ते अतोनात नुकसान करीत आहेत. या परिसरात तब्बल ३० रानटी गव्यांचा कळप आहे. या गव्यांचा बंदोबस्त वनखात्याने करावा, अन्यथा शेतीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्या बागायतीला कुंपण घालून द्यावे, अशी मागणी बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.
सटमटवाडी येथे मेहनतीने शेतकऱ्यांनी बागायती फुलविल्या आहेत. याठिकाणी काजू, सुपारी, नारळ बागायती मोठ्या प्रमाणात असून शेतकरी बागायतीमध्ये आंतरपीकदेखील मोठ्या प्रमाणात घेतात. तसेच उन्हाळी भाजीपाला, नाचणी, मिरची लागवड शेतकऱ्यांकडून करण्यात येते.
शेतीबरोबरच काजू, सुपारीची कलमेदेखील गव्यांकडून मोडण्यात येत असल्याने शेतकरी गव्यांच्या त्रासामुळे त्रस्त झाले आहेत. गव्यांच्या कळपाचे दिवसादेखील बागायतीमध्ये दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांना बागायतीमध्ये जाणेही जिकीरीचे ठरत आहे.
गव्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत स्थानिक शेतकरी बाबी वसकर आणि सुभाष परब यांनी बांदा वनपाल एस. एस. शिरगावकर यांची भेट घेतली. गेल्या दोन महिन्यांत गव्यांनी शेती बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचे सांगितले. येथील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर असल्याने आम्हांला नुुकसानभरपाई नको, मात्र शेतकऱ्यांच्या बागायतीला संरक्षक कुंपण करुन द्या अशी मागणी करण्यात आली.
वनपाल शिरगावकर यांनी आपल्या भावना वरिष्ठांना कळवू, गव्यांना बागायतीतून हुसकावून लावण्यासाठी वनखात्यामार्फत प्रयत्न केले जातील. त्यासाठी वनकर्मचारी पाठविण्याचे आश्वासन शिरगावकर यांनी शेतकऱ्यांना दिले.
गतवर्षी सटमटवाडी परिसरात माकडतापाची साथ असल्याने शेतकऱ्यांनी शेती बागायतीकडे दुर्लक्ष केले होते. शेतीतून मिळणाºया वर्षभराच्या कमाईवर पाणी सोडल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी शेती बागायतीकडे पूर्ण लक्ष देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यावर्षी गव्यांनी या परिसरात उच्छाद मांडल्याने शेतकरी आर्थिक मेटाकुटीस आले आहेत.
बांदा-सटमटवाडी येथे गव्यांनी काजू कलमांचे मोठे नुकसान केले.