कडावल (ता. कुडाळ) : भात उत्पादनासह वैरणनिर्मिती व शेतबंधाऱ्यांच्या संरक्षणासाठी वायंगणी शेती उपयुक्त आहे. मात्र वन्य प्राण्यांचा उपद्र्रव व पाणीटंचाईमुळे यंदा वायंगणी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भात कापणीनंतर परिसरात वायंगणी भातपेरणी केली जाते. हे पीक प्रामुख्याने पाणथळ म्हणजे शेळ जमिनीत केली जाते. कुसगाव, गिरगाव, नारूर, हिर्लोक, किनळोस, रांगणातुळसुली, निवजे आदी गावांमध्ये शेळ जमिनीचे प्रमाण अधिक असल्याने या गावात पूर्वीपासून वायंगणी पीक घेतले जाते.वायंगणी शेतीपासून मिळणारे गवत मऊशार व उत्कृष्ट दर्जाचे असते. शिवाय या शेतीपासून काही प्रमाणात भात उत्पादन मिळते. खरीप भात पिकाच्या तुलनेत वायंगणी भात पिकापासून मिळणारे उत्पादन कमी असले तरी, भात व विशेषत: उत्कृष्ट दर्जाच्या वैरणीच्या गवतासाठी प्रामुख्याने वायंगणी शेती केली जाते. शेत लागवडीखाली आल्याने गुरांना चरण्यासाठी मोकाट सोडण्याला अटकाव होऊन त्यांच्यापासून शेतबंधाºयांचे होणारे नुकसान टळते. या कारणासाठीही अनेक शेतकरी वायंगणी शेती करतात.भात उत्पादन, वैरण निर्मितीसह शेतमेरांच्या संरक्षणासाठी वायंगणी शेती उपयुक्त असली, तरी विविध कारणांमुळे ही शेती दिवसेंदिवस अडचणीत येत आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांपासून या शेतीला पाणी टंचाईची झळ बसत आहे. पूर्वी शेळ जमिनीत शिगम्यापर्यंत पाणीसाठा असायचा.
आता मात्र वायंगणी पीक पोटरू अवस्थेत येण्यापूर्वीच शिवारातील पाणी आटून जमिनीला भेगा पडतात. त्यामुळे वायंगणी शेतीचे नुकसान होत आहे. पाण्याच्या समस्येबरोबरच वन्य प्राण्यांच्या उपद्र्रवामुळेही ही शेती संकटात आली आहे. रानडुुक्कर, गवे व माकडांसारख्या प्राण्यांकडून पिकाचे सतत मोठ्या प्रमाणात नुकसान होते.लागवडीखालील क्षेत्र घटणारयंदा पाऊस भरपूर प्रमाणात पडूनही पुढील पाणी टंचाईची समस्या आतापासूनच दृष्टीपथात येत आहे. वहाळांची साखळी आतापासूनच तुटत आहे. शेळ जमिनीतील वाफे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे पुढील काळात पाणी टंचाई होणार हे अटळ आहे. तसेच वन्य प्राण्यांच्या उपद्र्रवाचे सावटही कायम असल्याने यंदा वायंगणी भात लागवडी खालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता आहे.