सिंधुदुर्गनगरी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच जिल्हा नियोजन समिती सदस्यपदासाठीच्या दोन जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपा-शिवसेनेला धोबीपछाड दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.२४ जागांपैकी काँग्रेसला १५, भाजपाला ३ तर सेनेला ६ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला सर्वाधिक १५ जागा मिळाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहणार आहे.नगर परिषद मतदारसंघातून काँग्रेसच्या राजू बेग यांनी शिवसेनेच्या शुभांगी सुकी यांचा ६ मतांनी पराभव केला. बेग यांना २९ तर सुकी यांना २३ मते मिळाली. तर नगरपंचायत मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या संध्या तेरसे यांनी भाजपाच्या उषा आठल्ये यांचाही ६ मतांनी पराभव केला.जिल्हा नियोजन समिती सदस्य निवड प्रक्रियेमध्ये २२ जागांवर शिवसेना, काँग्रेस व भाजपा या पक्षांकडून यशस्वी शिष्टाई झाल्याने या जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर दोन जागांवर वरील तिन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून समझोता न झाल्याने अखेर प्रशासनास निवडणूक घेणे भाग पडले होते.
सिंधुदुर्गात काँग्रेसकडून सेना-भाजपाला धोबीपछाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 3:59 AM