बांदा : पाडलोस-हवालदारवाडी येथे आपल्या बागायतीत गेलेले मोहन गावडे यांच्या अंगावर गवा धावून आल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता घडली. गावडे यांनी हुशारीने प्रसंगावधान राखून तेथून पळ काढला. भरवस्तीत गव्यांचा संचार असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.वन्यप्राण्यांचा भरवस्तीत वावर वाढला आहे. मोहन गावडे संध्याकाळी आपल्या काजू बागायतीत गेले असता अचानक गवा समोर आला. गावडे यांनी तेथून पळ काढला व याची खबर संतोष आंबेकर यांना दिली. आंबेकर यांनी ग्रामस्थांना जमवून त्या गव्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो गवा पुन्हा पुन्हा ग्रामस्थांच्या अंगावर धावून येऊ लागला.
सुमारे अर्ध्या तासांच्या अथक प्रयत्नांती दहा ते बारा ग्रामस्थांनी त्या गव्याला जंगलाच्या दिशेने पळवून लावले. यावेळी दिलीप आईर, प्रतीक्षा करमळकर, प्रसाद करमळकर, सुभाष करमळकर, कविता आंबेकर, प्रकाश गावडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, मडुरा गावात गव्यांनी पिकांची नासधूस केल्याची घटना ताजी असताना आज रात्री पुन्हा एकदा पाडलोसमध्ये मिरची, मका, फजाव, चळवळीचे गव्यांनी नुकसान केले. पाडलोस उपसरपंच महादेव गावडे तसेच तुकाराम शेटकर, हर्षद गावडे यांच्या पिकांचे नुकसान केले.
गव्यांच्या वारंवार होणाऱ्या उपद्रवावर वनविभागाने वेळीच उपाययोजना न केल्यास तालुक्यातील शेतकरी, बागायतदारांसमवेत वनविभाग कार्यालयावर धडकणार असल्याचे शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी सांगितले.
आवश्यक त्यावेळी वनविभाग नॉटरिचेबल किंवा फोन उचलत नसल्याने शेटकर यांनी नाराजी व्यक्त केली व याकडे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. दरम्यान, वनविभागाशी संपर्क साधला असता प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन पाहणी करणार असल्याचे अमित कटके यांनी सांगितले.तो गवा जखमी; गस्त ठेवण्याची मागणीपाडलोस, मडुरा, रोणापाल गावात फिरणाऱ्या गव्यांच्या कळपात एक गवा जखमी अवस्थेत असल्याची चर्चा आहे. काल सायंकाळी पाडलोस हवालदारवाडी येथे आलेला गवा जखमी असावा. जर गवा जखमी असेल तर त्यावर वनविभागाने उपचार करण्याची गरज आहे. तसेच शेतकरी, बागायतदारांसाठी मडुरा व पाडलोसमध्ये वनविभागाने कायम गस्त ठेवण्याची मागणी होत आहे.